नगर : 232 जणांची रस्त्यावर दुकानदारी | पुढारी

नगर : 232 जणांची रस्त्यावर दुकानदारी

नगर : पुढारी वृत्तसेवा : शहरातील मुख्य रस्ता, डीपी रोड, उपनगरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे करून रस्त्यावर पत्राशेड झाल्याची तक्रारी होत्या. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी अतिक्रमण विभागाला मोजणी करण्याचा आदेश दिला होता. त्या मोजणीत प्रभाग समिती तीन वगळता सुमारे 232 नागरिकांनी रस्त्यावर अतिक्रमित पत्राशेडमधून दुकानदारी करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील मुख्य रस्ते, उपनगरातील रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत दै. पुढारीने वारंवार वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यावर आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी अधिकार्‍यांची बैठक घेऊन अतिक्रमण प्रतिबंधक विभागाला रस्त्यावर अतिक्रमण करून पत्राशेड उभे करणार्‍यांची सर्व्हेक्षण करून मोजणी करण्याचा आदेश दिला होता.

दरम्यान, शहरातील पत्राशेड अतिक्रमणधारकांना यापूर्वी अतिक्रमण काढून घेण्याबाबत नोटिसा देण्यात आल्या होत्या. मात्र, त्याला अतिक्रमणधारक प्रतिसाद देत नसल्याचे समोर आले होते. शहरात विविध ठिकाणी जाहिरातीलचे फलक लावल्याचे निदर्शनास येत आहे. उच्च न्यायालयाने अनधिकृत होर्डिंग्ज हटविण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. शहरातील प्रमुख रस्ते, डीपी रोड, मुख्य रस्ता, उप-रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बांधकाम परवानगी क्षेत्राच्या बाहेर देखील पत्राशेड तत्सम बांधकाम केल्याचे दिसून येत आहे. पत्राशेडचे बांधकाम नियमानुकुल होत नाही.

याबाबत सर्व्हेक्षण करून अनधिकृत बांधकाम हटविण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना आयुक्त पंकज जावळे यांनी अधिकार्‍यांना दिल्या होत्या. आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिलेल्या आदेशावरून अतिक्रमण प्रतिबंधक विभागातील पथकाने गेल्या काही दिवसांपासून सर्व्हेक्षण करून अतिक्रमण मोजणीची मोहीम हाती घेतली होती. पाईपलाईन रोड, नगर-मनमाड रोड, नगर-पुणे रोड, नगर-कल्याण, नगर-औरंगाबाद रोड असा मुख्य रस्त्यांसह डीपी रोडवरील पत्राशेडचे अतिक्रमण मोजण्यात आले. प्रभाग समिती एक, दोन व चारमध्ये सुमारे 232 जणांनी रस्त्यावर अतिक्रमण करून पत्राशेड व बांधकाम केल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, प्रभाग समिती तीनमध्ये अद्याप मोजणी सुरू आहे. दरम्यान, मोजणीत आढळून आलेल्या अतिक्रमणावर लवकरच हातोडा पडणार असल्याचे समजले.

Back to top button