नगर : दुय्यम कारागृहाचा प्रस्ताव ‘लाल फितीत’ | पुढारी

नगर : दुय्यम कारागृहाचा प्रस्ताव ‘लाल फितीत’

कोपरगाव : येथील तहसील कार्यालयानजीक असलेले वर्षानुवर्ष जुने झालेले दुय्यम कारागृह मोडकळीस आले आहे. या कारागृहाचे नूतनीकरण व्हावे, दोन मजली इमारत व्हावी म्हणून शासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र सत्ता बदलामुळे हा प्रस्ताव पुन्हा एकदा लाल फितीत अडकला आहे.  तहसील कार्यालयाची इमारत नव्याने उभारण्यात आली. त्या नजीक असलेले दुय्यम कारागृह पूर्णतः मोडकळीस आले आहे. या कारागृहात एकूण पाच बराकी आहेत. वीस कैदी क्षमता असलेल्या कारागृहात सध्या 94 कैदी अक्षरशः कोंबण्यात आले आहेत. त्यामुळे कैद्यांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

येथील कारागृह नव्याने व्हावे म्हणून तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे व आमदार आशुतोष काळे यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्याची दखल घेत शासनाने व सार्वजनिक बांधकाम अहमदनगर विभागाने सहा कोटी 33 लाख 26 हजार रुपये किमतीचा तहसील कार्यालय आवारात सबजेल बांधकाम करण्यासाठी 30 मार्च 2022 ला प्रस्तावही सादर केला होता. मात्र सत्ता बदलाने हा प्रस्ताव पुन्हा रखडला गेला आहे.

दोन मजली दुय्यम कारागृह येथे साकारले जाणार होते. त्यात तळमजला 488.71 चौरस मीटर, पहिला मजला 407. 93 चौरस मीटर असे आशयाचे प्रस्तावित बांधकाम करावयाचे होते. त्याबाबतचे संबंधित नकाशे चतुःसिमा, अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. आरसीसी फ्रेम स्ट्रक्चर बांधकाम, बीम कॉलम फ्लोरिंग, टाइल्स रस्ते पार्किंग आदी सोयी सुविधा येथे आवश्यक करणार येण्यात होत्या. मात्र हा प्रस्ताव लाल फिरत अडकल्याने पुन्हा बारगळला गेला आहे.

कोपरगाव तालुक्यात या दुय्यम कारागृहात लोणी, प्रवरानगर, राहता, शिर्डी, कोपरगाव आदी ठिकाणचे कैदी ठेवण्यात येतात. त्यांना ने- आण करणे पोलिस बळ लागते, वेळही खर्च होता. जुनाट झालेले दुय्यम कारागृह वर्षानुवर्ष या कारागृहाचे काम रखडले गेले आहे. हे दुय्यम कारागृह खतरनाक आरोपींनी दोन वेळा फोडून पलायन केले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरती डागडुजी केली. जाळ्या वगैरे बसवल्या, मात्र क्षमतेपेक्षा चारपट ज्यादा कैदी येथे ठेवले जात असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आहे.

पोलिसांना डोळ्यात तेल घालून कामगिरी बजवावी लागते. तसेच या कारागृहाला सध्या तहसील कार्यालयात अव्वल कारकून असलेले चंद्रशेखर कुलथे यांना सब जेलर म्हणून अधिक काम पाहावे लागते. त्यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर क्षमतेपेक्षा जादा कैदी झाल्याने वारंवार पत्रव्यवहार करून एकदा पन्नास आरोपी व एकदा तीस आरोपी नाशिक जेलमध्ये पाठवले होते. मात्र सध्या मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल होत असल्याने आरोपींची संख्या वाढत आहे. मात्र ते ठेवायला बराकींची संख्या वाढली जात नाही, त्यामुळे विविध प्रश्न निर्माण होतात.

सब जेलरचे पद निर्माण करावे…
नगर जिल्ह्यात जेथे जेथे सबजेल आहेत, त्या ठिकाणी स्वतंत्र दर्जाचे सब
जेलर दर्जाचे पद आहे. मात्र कोपरगाव येथील दुय्यम कारागृहास सब जेलरचे पद स्वतंत्र नाही. त्यामुळे ते पद निर्माण करावे म्हणजे त्याचा पदभार स्वतंत्र राहील, अशी मागणी होत आहे.

Back to top button