

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा: पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील मालपाणी कंपनीजवळ भरधाव वेगाने येत असणाऱ्या कार चालकाचा अचानक गाडीवरील ताबा सुटल्यामुळे कारने महामार्गावरील डिव्हायडरला जोराची धडक दिली. नंतर डिव्हाडर तोडून महामार्गावरील झाडांची छाटणी करणाऱ्या दोघा परप्रांतीय कर्मचाऱ्यांना जोराची धडक दिली असता झालेल्या भीषण अपघातात ते दोन कर्मचारी जागीच ठार झाले. गिरीजा मुनसी तुरीया (वय ५२ रा. गहलोर, बडकी इस्लामनगर, बिहार) आणि सुरेश चेतु खैरवार ( वय 55, रा. गहलोर, जुमई मरकामा, बिहार) असे अपघातामध्ये ठार झालेल्या दोन कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नाशिकहून संगमनेर मार्गे पुणेच्या दिशेने भरधाव वेगात जाणारी कार (एमएच१ ४ जेएच ०८३) ही मंगळवारी सायंकाळी पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील मालपाणी कंपनीजवळ आली असता चालक शशिकांत संजय घोडेकर (रा. पंचवटी नाशिक) याचा अचानक कारवरील ताबा सुटला. आणि या कारने महामार्गावरील डिव्हायडरला लावलेल बॅरिकेट उडवून दिले. यावेळी महामार्गावर असणाऱ्या झाडांची छाटणी करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना जोराची धडक दिली. या धडकेत दोन्ही कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना तात्काळ शहरातील मेडिकव्हर या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच ते मयत झाले असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
या प्रकरणी अमोल सुभाष बनसोडे (रा. चंदनापुरी, मुळ रा लातुर) यांनी संगमनेर शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी कार चालक शशिकांत संजय घोडेकर याच्यावर मोटारसायकल कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो. नि. राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. धनंजय महाले हे करत आहेत.
या भीषण अपघातात कारचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातानंतर महामार्गावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प होती. अपघाताची माहिती संगमनेर शहर पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी जात कार चालकाला ताब्यात घेतले आणि अपघातग्रस्त कार बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली.
दरम्यान दुसरीकडे पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खालची माहुली परीसरातील हिराबाई बाळशीराम दिघे ही महिला महामार्गाने माहुलीकडून १९ मैल परीसराकडे पायी चालल्या होत्या. त्याच दरम्यान पुणेकडून नाशिकच्या दिशेने जाणारी कार (एमएच १२ एमआर ४३२०)ने दिघे या प्राचार्य महिलेला जोराची धडक दिली दिली. या धडकेत ती महिला जागीच ठार झाली. या अपघाताची माहिती समजताच महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी आपल्या पथकासह घटना स्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला