नगर : तालुक्यातील जेऊर बनलेय कांदा व्यापार्‍यांचे माहेरघर ! | पुढारी

नगर : तालुक्यातील जेऊर बनलेय कांदा व्यापार्‍यांचे माहेरघर !

शशिकांत पवार :

नगर तालुका : संपूर्ण नगर जिल्ह्यातील कांदा खरेदी-विक्री ही नगर तालुक्यातून होत आहे. या व्यवसायातून शेकडो हातांना काम मिळत आहे. नगर तालुका राज्य, तसेच परराज्यातील व्यापार्‍यांचे माहेरघर बनले आहे. अनेक परराज्यातील व्यापारी येथे स्थायिक होऊन आपला व्यवसाय संपूर्ण जिल्ह्यात करताना दिसून येतात. कांदा व्यापार्‍यांचा मुख्य केंद्रबिंदू जेऊर बनलेले असून, कोट्यावधी रुपयांची उलाढाल यातून होताना दिसते.  नगर तालुका ज्वारीचे पठार म्हणून ओळखला जायचा. परंतु, गेल्या दोन दशकांपासून तालुक्यात कांदा उत्पादनात लक्षणीय वाढ झाली. त्यामुळे नगर तालुक्याची ज्वारीचे पठार म्हणून असलेली ओळख पुसून आता कांद्याचे पठार म्हणून उदयास येत आहे. तालुक्यातील शेतकर्‍यांनी जिरायत जमिनी सिंचनाखाली आणून मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादनास सुरुवात केली.

डोंगर उताराची तसेच पाण्याचा निचरा होणारी जमीन लाल कांद्यासाठी पोषक असते. त्यामुळे तालुक्यात लाल कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. जेऊर पट्ट्यात ससेवाडी, बहिरवाडी, डोंगरगण, इमामपुर येथील कांदा तर राज्यात प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर वाळकी, चिचोंडी पाटील, डेहरे, चास या गटातही कांदा उत्पादनाकडे शेतकरी वळलेला दिसून येतो. लाल कांद्याबरोबर गावरान कांदा, तसेच रांगडा कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

नगर तालुक्यातील वाढते कांद्याचे उत्पादन व कांद्याची गुणवत्ता यामुळे कांद्याला बाजारपेठेत चांगली मागणी असते. कांद्याचे उत्पादन व गुणवत्ता हेरून राज्य, तसेच परराज्यातील व्यापार्‍यांनी येथील कांदा शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन खरेदी करण्यास सुरुवात केली. हळूहळू आपले बस्तान येथे बसवून जिल्ह्यातील कांदा खरेदी तालुक्यातून सुरू केली. जेऊर सारख्या ठिकाणी अनेक परराज्यातील व्यापार्‍यांनी स्थायिक होत स्थावर मालमत्ता खरेदी करून आपला व्यवसाय जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सुरू केला आहे.

कांदा व्यापार्‍यांमुळे तालुक्यातील शेकडो महिला, तसेच तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. खरेदी केलेला कांदा भरण्यासाठी महिलांना मोठ्या संख्येने रोजगार उपलब्ध होत आहे. तर, हमाल तसेच वाहनचालकांना ही या व्यवसायामुळे भरभराट प्राप्त झाली आहे. कांदा भरण्यासाठी महिलांना घेऊन जाण्यासाठी अनेक तरुणांनी वाहने खरेदी करून या व्यवसायातून उत्पन्न मिळविण्याचा मार्ग अवलंबला आहे. तसेच, व्यापार्‍यांच्या वखारीचे राखण, कांदा खरेदी विक्री करताना मुकादम म्हणून काम करत मोठ्या संख्येने तरूण कुटुंबाची उपजीविका भागवत आहेत.

कांदा भरण्यासाठी महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. साधारणपणे तीनशे रुपये रोजंदारी मिळते. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च असे तीन महिने वगळता नऊ महिने कांदा व्यवसायातून रोजगार उपलब्ध होत आहे. मजुरीसाठी भटकंती करावी लागत नाही.
                                                   – लक्ष्मीबाई पाटोळे, मजूर, जेऊर

नगर तालुक्यातील व्यापार्‍यांचा व्यवहार हा पारदर्शक राहिलेला आहे. नगर तालुक्यातील कांदा व्यापार्‍यांनी जिल्ह्यात शेतकर्‍यांचा विश्वास संपादन केला आहे. त्यामुळे शेतकरी आपला कांदा शेतामध्ये या व्यापार्‍यांना मोठ्या विश्वासाने देतात. त्यांच्याकडूनही फसवणुकीचे प्रकार घडत नाहीत. आमचा कांदा दरवर्षी शेतामध्ये व्यापार्‍यांना दिला जातो.
                            – भाऊसाहेब वाघुले, शेतकरी, गोंडेगाव, ता. नेवासा

Back to top button