नगर : महावितरण कर्मचार्‍यांचा गलथान कारभार | पुढारी

नगर : महावितरण कर्मचार्‍यांचा गलथान कारभार

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा :  जेऊर येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयात गलथान कारभार सुरू असून, कर्मचारी कामच करत नसल्याने अनेक भागातील वीज दोन दिवसांपासून गायब झाली आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी कर्मचार्‍यांविरोधात घोषणाबाजी करत मंगळवारी (दि.17) ठिय्या आंदोलन केले. जेऊर येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयातील कर्मचारी कामचुकारपणा करत आहेत. शेतकर्‍यांचे फोन न उचलणे, नादुरुस्त झालेले रोहित्र, विद्युत वाहिन्या तात्काळ दुरुस्त न करणे, असे प्रकार सुरू आहेत. चापेवाडी, डोंगरगण, लिगाडे वस्ती, शेटे वस्ती येथे दोन दिवसांपासून वीज नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी महावितरण कंपनीच्या जेऊर कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

शेतकर्‍यांशी कनिष्ठ अभियंता सागर बेंडकुळे यांनी मध्यस्थी करत तत्काळ समस्यांचे निराकरण करणार असल्याचे सांगितले. कनिष्ठ अभियंता बेंडकुळे यांचे काम चांगले असून, त्यांना कर्मचार्‍यांची साथ मिळत नसल्याने कार्यालयात सावळागोंधळ सुरू असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले. कर्मचार्‍यांवर वरिष्ठ अधिकार्‍यांचे नियंत्रण नसल्याचे दिसून येते. पाणी उपलब्ध असूनही विजेचा खेळखंडोबा होत असल्याने पिके जळून जाण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. अतिवृष्टीने खरीप हंगाम वाया गेला. लाल कांद्याला बाजार भाव मिळत नसल्याने खर्च वसूल होणे देखील अवघड बनलेले आहे.

सद्यस्थितीत शेतात गहू, हरभरा, गावरान कांदा असून, विजे अभावी पिके जळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. जेऊर कार्यालयातील कर्मचारी मनमानी पद्धतीने काम करत असून, वेळेवर कामावर हजर राहत नाहीत. नादुरुस्त झालेले रोहित्र, विद्युत वाहिन्या दुरुस्तीसाठी नेहमीच विलंब करण्यात येतो असा आरोप यावेळी शेतकर्‍यांकडून करण्यात आला. याप्रसंगी सोसायटी उपाध्यक्ष सोमनाथ तोडमल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भटक्या विमुक्त जाती जमातीचे सेलचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय डोकडे, रविराज तोडमल, शरद तोडमल, श्रीकांत तोडमल, नंदू तोडमल, अर्जुन तोडमल, तेजस शेटे, मयूर तोडमल, विठ्ठल तोडमल, भैरवनाथ वाघमारे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कर्मचार्‍यांनी कामात हलगर्जीपणा केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. यापुढे शेतकर्‍यांची पिळवणूक होणार नाही, याबाबत कर्मचार्‍यांना सक्त ताकीद देण्यात येईल.
                                       – सागर बेंडकुळे, कनिष्ठ अभियंता, महावितरण

Back to top button