नगर : तुकाई सिंचन योजनेचा मार्ग सुकर ; वन विभागाची परवानगी मिळाल्याने कामाला सुरुवात

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : कर्जत तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणार्या तुकाई उपसा सिंचन योजनेचे काम वन विभागाच्या परवानगी अभावी गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित होते. परंतु, आता वन विभागाने परवानगी दिल्याने तुकाई चारी पूर्ण होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. बिटकेवाडी येथे जमिनी अंतर्गत पाण्याची पाईपलाईन वनक्षेत्रातून जात आहे. त्यामुळे वन विभागाच्या परवानगी अभावी ही योजना 40 टक्के काम पूर्ण झाले असतानाही पुढील काम बंद पडले होते. योजनेअंतर्गत 23 पाझर तलाव पुनर्भरण व सिंचन वापरासाठी प्रस्तावित होते. या योजनेत तत्कालीन भाजप शासन काळात गायकरवाडी, खंडाळवाडी, वाघनळी, पाटेगाव खालील चांदे बुद्रुक या चार तलावांचा समावेश न झाल्यामुळे पुनर्भरण व वापरास परवानगी मिळालेली नव्हती. राखीव वनातील काही क्षेत्रे संपादित होणे गरजेचे असल्यामुळे वनविभागाची संमती देखील प्राप्त होणे आवश्यक होते.
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तत्कालीन लोकप्रतिनिधींनी घाईगडबडीने निधी मंजूर केला. पण, त्याला लागणार्या प्राथमिक परवानग्या मात्र त्यांनी घेतल्या नाहीत. त्यामुळे योजनेचे काम लांबले होते. वन्यजीव विभागाची परवानगी मिळण्यासाठी बहुतांश वेळा मोठ्या प्रमाणात अडचणी येत असतात. परंतु, आमदार रोहित पवार यांनी प्रलंबित असलेल्या तुकाई चारीच्या विषयासंदर्भात वन विभागाच्या अधिकार्यांशी वेळोवेळी बैठका घेतल्या. तसेच, समक्ष पाहणी करून व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन पाठपुरावा केला. त्यानंतर अखेर 11 जानेवारी रोजी महसूल व वन विभाग उपवनसंरक्षक (वन्यजीव) यांच्याकडून सदरील कामाला मान्यता मिळाली असून, मंगळवारी (दि.17) प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे.
आता वन विभागाची परवानगी मिळाल्याने योजना पूर्णत्वाकडे जात आहे. कर्जत तालुक्यातील अवर्षण प्रवण क्षेत्रातील तीन लघु पाटबंधारे प्रकल्प व 24 पाझर तलाव कुकडी कालव्यामधून पाणी उपसा करून बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे भरून देण्याचे प्रयोजन आहे.
द्वेषाच्या राजकारणाबाबत खंत
विविध विभागांच्या परवानगीअभावी योजना रखडली होती. कुठलाही प्रकल्प राजकीय द्वेषातून आम्ही थांबवित नाही. उलट सत्ता असताना महाविकास आघाडी सरकारच्या काळात अधिकची आर्थिक ताकद विविध योजनांना आम्ही दिली आहे. पण, आताचं द्वेषाचे राजकारण बघितल्यानंतर मनापासून खंत वाटते, असे आ. रोहित पवार यांनी सांगितले.