चांदा विद्यालयातील राड्याची दखल; शिक्षक, पालक, ग्रामस्थांसह पोलिस यंत्रणेची समन्वय बैठक | पुढारी

चांदा विद्यालयातील राड्याची दखल; शिक्षक, पालक, ग्रामस्थांसह पोलिस यंत्रणेची समन्वय बैठक

चांदा; पुढारी वृत्तसेवा : नेवासा तालुक्यातील चांदा येथील जवाहर विद्यालयात दोन विद्यार्थ्यांत झालेल्या राड्याचे वृत्त दैनिक पुढारीत प्रसिद्ध होताच, पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. पालक आपली मुले शाळेत पाठविण्यास घाबरत असल्याने, तातडीने शिक्षक, पालक, ग्रामस्थ, पोलिस यंत्रणेसह दक्षता कमिटीची समन्वय बैठक घेण्यात आली.

गेल्या काही महिन्यांपासून शाळेतील विद्यार्थी व शाळेबाहेरील मुले यांच्यामध्ये सतत वाद होत होते. शिक्षकांनी पालकांना बोलावून समज देण्याचे प्रयत्नही केले होते. झालेले सर्व वाद आपसात मिटविले जात होते. परंतु, रविवारच्या घटनेमुळे त्याचा अतिरेक झाला. यापूर्वीच ही बैठक घेऊन गंभीर दखल घेणे गरजेचे होते. कालपासून हे प्रकरण शांत करण्याचे प्रयत्न सुरू होते.

दैनिक पुढारीच्या वृत्ताची दखल घेऊन चांद्याच्या सरपंच सुनंदा दहातोंडे, दक्षता कमिटीचे अध्यक्ष कैलास दहातोंडे, संस्थेचे विश्वस्त डॉ.दीपक शिंदे, सोनई पोलिस ठाण्याचे निरीक्षक चौधरी यांनी तातडीची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी भाऊसाहेब जावळे, देविदास पासलकर, प्राचार्य जावळे, पोलिस निरीक्षक चौधरी यांनी मत व्यक्त केले. बैठकीस येथील कल्पना लोखंडे, हमीद इनामदार, चांदेकर, गाढवे, पंडित यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, शिक्षिका, ग्रामस्थ उपस्थित होते.

उपचार खर्चाची शाळेकडे मागणी
जखमी विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी दवाखान्यात उपचाराच्या खर्चाची शाळेकडे मागणी केली. हा विद्यार्थी गरीब कुटुंबातील असून, त्याचे पालक अपंग आहेत. खोलवर जखमेमुळे त्याचा हात निकामी होऊ शकतो. वर्गात असणार्‍या मुलांची जबाबदारी शिक्षकांची असावी, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Back to top button