विहिरीत पडलेल्या उदमांजराला जीवदान; जेऊर येथील घटना | पुढारी

विहिरीत पडलेल्या उदमांजराला जीवदान; जेऊर येथील घटना

नगर तालुका; पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील जेऊर येथील विहिरीत पडलेल्या उदमांजराला वनविभागातर्फे सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले. सोमवारी (दि.16) जेऊर परिसरातील सुनील पाटोळे यांच्या विहिरीमध्ये उदमांजर पडल्याचे आढळून आले. वनमित्र पथकाचे सदस्य बंडू पवार, मायकल पाटोळे, रघुनाथ पवार यांनी पाहणी करून सदर प्राणी हा उदमांजर असल्याची खात्री केली. उदमांजर विहिरीत पडल्याची माहिती वनमित्र पथकाने वन विभागाला दिली. वनविभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी सुरेश राठोड, वनपाल मनेष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक श्रीराम जगताप व कर्मचार्‍यांनी विहिरीत उतरून जाळीच्या साह्याने उदमांजराला बाहेर काढत निसर्गात मुक्त केले.

उदमांजराचे संरक्षण होणे गरजेच
उदमांजराबाबत समाजात काही अंधश्रद्धा असून, त्यावर विश्वास ठेवू नये. उदमांजर प्राणी हा मनुष्यास कोणतीही हानी पोहोचवत नाही. तो एक प्रकारे शेतकर्‍यांचा मित्र असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले. भारतीय वन्यजीव कायदा 1972 अन्वये उदमांजराची शिकार करणे, पाळणे हा गुन्हा असल्याने त्याचे संरक्षण होणे गरजेचे असल्याचे वनरक्षक श्रीराम जगताप यांनी सांगितले.

Back to top button