राहुरी : त्या शिक्षकाचा फैसला झेडपीतून! शिक्षणाधिकारी भास्कर पाटील घेणार निर्णय | पुढारी

राहुरी : त्या शिक्षकाचा फैसला झेडपीतून! शिक्षणाधिकारी भास्कर पाटील घेणार निर्णय

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील एका शाळेमध्ये शिक्षकाने सहलीमध्ये मुलींसमवेत रंगिले चाळे केल्याच्या चर्चेने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. अखेरीस राहुरी तालुका गटशिक्षणाधिकारी गोरक्षनाथ नजन यांनी आपला अहवाल जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे सुपूर्द केला आहे. जिल्हा शिक्षण अधिकारी भास्कर पाटील हे याप्रकरणी योग्य निर्णय घेणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी नजन यांनी सांगितले.

राहुरी तालुक्यातील एका शाळेची सहल मुंबई येथे गेली होती. सहलीच्या ठिकाणी वात्रट चाळे केल्याच्या तक्रारी विद्यार्थीनींनी घरी परतल्यावर पालकांकडे केल्या. या घटनेची माहिती सर्वत्र होताच पालकांनी शाळेमध्ये दाखल होत एकच गोंधळ घातला. अखेरीस राहुरी शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी नजन यांनी शाळेत धाव घेत पालकांच्या व्यथा जाणून घेतल्या.

याबाबत गटशिक्षणाधिकारी नजन यांनी सांगितले की, संबंधित शाळेमध्ये पालकांची मोठी गर्दी जमा झाली होती. संबंधित शिक्षकाला निलंबित करा, शिक्षकाची बदली करा, संबंधित शिक्षकाला धडा शिकवा, अशा वेगवेगळ्या मागण्या पालकांकडून होऊ लागल्या.
पालकांसह सहलीमध्ये तक्रार असलेल्या त्या सहा विद्यार्थीनींच्या तक्रारीची लेखी माहिती घेण्यात आली.

पालक, विद्यार्थीनी व शाळेतील इतर शिक्षकांचा लेखी जबाब नोंदवत अहवाल तयार करण्यात आला होता. जिल्हा शिक्षण विभागाने अहवाल सादर करण्याचे आदेश देताच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे सविस्तर लेखी जबाब व अहवाल पाठविण्यात आला आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातून आता शिक्षणाधिकारी पाटील हे याप्रकरणी शिक्षकाला निलंबित करणार का, की अन्य काही निर्णय घेतात, याकडे राहुरी तालुक्यातील पालकांचे लक्ष लागले आहे.

Back to top button