नगर : चांदा विद्यालयात विद्यार्थ्यांचा राडा | पुढारी

नगर : चांदा विद्यालयात विद्यार्थ्यांचा राडा

चांदा : पुढारी वृत्तसेवा :  नेवासा तालुक्यातील चांदा येथील जवाहर विद्यालयात कला आणि विज्ञान शाखेच्या दोन विद्यार्थ्यांत वाद झाला. यातील एकाने धारदार शस्त्राने वार केल्याने दुसरा विद्यार्थी गंभीर जखमी झाला. तेथील वर्गातील बाक आणि व्हरांड्यात रक्ताचा सडा पडला होता. हातावर खोलवर जखम झाल्याने त्यास नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे शाळेतील विद्यार्थी मात्र भयभीत झाले आहेत.

शाळेतील मुलांमध्ये एक वर्षापासून वाद होत असल्याने हा प्रकार घडल्याची माहिती मिळाली. आठ दिवसांपूर्वी मुलांच्या दोन गटांत मराठी शाळेच्या आवारात मारामार्‍या झाल्या होत्या. त्यामध्येही दगडफेक करून धारदार शस्त्रांचा वापर झाल्याने दोन मुले गंभीर जखमी झाली होती. या वादाला प्रोत्साहन देणारे काही विद्यार्थी नंतर दप्तर टाकून तेथून पळून गेले. पालकांचे लक्ष नसल्याने मुलांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत. यामधे शाळेबाहेरील मुलेही भाग घेत असल्याने हे वाद वाढत चालले आहेत.

जखमी मुलाचे पालक, नातेवाईक व ग्रामस्थांनी विद्यालयात जाऊन घटनेबद्दल माहिती घेऊन शिक्षक-पालक कमिटीवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. वर्गात घुसून खुनी हल्ला होतो, येथे मुलांना सुरक्षा आहे का? मुल शाळेत कशी पाठवावीत, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. यावेळी मराठा महासंघाचे संभाजी दहातोंडे, भाऊसाहेब जावळे, दादू पंडित, बाळासाहेब दहातोंडे, बंडू दहातोंडे, वसंत भगत, चंदू जावळे उपस्थित होते. यावेळी नवीन कमिटी करावी, शाळेबाहेरील मुलांना आत प्रवेश देऊ नये, मुलांना मोबाईल वापर करू देऊ नये, आवारात अथवा गेटवर रस्त्यावर सतत फेर्‍या मारणार्‍यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशा मागण्या करण्यात आल्या. या वेळी शाळेत आणखी वाद वाढू नये, यासाठी सोनईचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजू थोरात यांच्यासह कॉन्स्टेबल लबडे, तुपे, म्हात्रे, पोलिस पाटील कैलास अभिनव यांनी बंदोबस्त ठेवला आहे.

..तर पालकांना राग येतो !

मुलांना बोललो तरी पालकांना राग येतो. मुले उगारून मागे बोलतात. दमबाजी करतात. काही पालकांनी तर शिक्षकांना मारले होते. तक्रारी करूनही पोलिसांकडून दखल घेतली गेली नाही. शासनाच्या काही बंधनामुळे शिक्षा करता येत नसल्याने मुले उद्धट होत आहेत, असे प्राचार्य जावळे यांनी सांगितले.

तक्रार कोण करणार ?

या घटनेतील एका विद्यार्थ्याचे पालक अपंग आहेत. तर, दुसर्‍याचे मयत झालेले आहेत. त्यामुळे तक्रार कोण करणार ? पुढे कोणी होत नाही, मुलांच्या पुढील शिक्षणाचा प्रश्न आहे. शाळेतील मुलांचे वाद परस्पर बाहेरच मिटविले जात असल्याने असे प्रकार वाढत असल्याचे बोलले जात आहे.

Back to top button