नगर : दुकानदारावर तीक्ष्ण हत्याराने वार | पुढारी

नगर : दुकानदारावर तीक्ष्ण हत्याराने वार

नेवासा : पुढारी वृत्तसेवा :  भाडेतत्त्वावर दिलेली टपरी रिकामी करण्याच्या कारणावरुन दुकानदारावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन त्यास जखमी करण्याची घटना शनिवारी घडली. या प्रकरणी बाळासाहेब पोपटलाल गांधी व मनोज पोपटलाल गांधी या दोघांविरोधात नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. परस्परविरोधी गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. शनिवारी दुपारी कुकाणा बसथांब्यालगत नेवासा मार्गावर ही घटना घडली.

महंमद कलिंदर इनामदार (रा जेऊरहैबती, ता. नेवासा) यांनी नेवासा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, कुकाणा बसथांबा परिसरात दुचाकी-चारचाकी वाहन पंक्चर दुकान असून, लगतची टपरी मनोज गांधी याला भाडेतत्त्वावर दिली होती. ती टपरी मला व्यवसायासाठी आवश्यक असल्याने ती रिकामी करुन देण्याची विनंती केली. या रागातून मनोज गांधी व बाळासाहेब गांधी या दोघा भावांनी मला शिवीगाळ करीत मारहाण केली. बाळासाहेब गांधी याने धारदार हत्याराने पायावर वार करून जखमी केले.

याप्रकरणी पोलिसांनी बाळासाहेब पोपटलाल गांधी व मनोज पोपटलाल गांधी यांच्यावर मारहाण व दुखापत केल्याचा गुन्हा नोंदविला. तर, बाळासाहेब गांधी यांच्या फिर्यादीवरुन महंमद इनामदार याच्यावरही मारामारीचा गुन्हा दाखल केला आहे. गांधी व इनामदार या दोघांनीही परस्परविरोधी फिर्यादी नोंदविल्या असून, कुकाणा पोलिस तपास करीत आहेत. दरम्यान, कुकाणा बाजारतळावरही अतिक्रमण करून बांधकाम करण्यासाठी पिंपळाच्या झाडावर कुर्‍हाड चालवून झाड तोडल्याने तणाव निर्माण झाला होता. सरकारी जागेवर व रस्त्यावरच सुरू असलेले अतिक्रमित बांधकाम लगतच्या नागरिकांनी बंद पाडले. अतिक्रमण करून बेकायदा बांधकाम करणार्‍यांवरही कारवाईची मागणी नागरिकांनी केली.

Back to top button