नगर : ‘हनी ट्रॅप’द्वारे भाच्याने घातला मामाला गंडा ! | पुढारी

नगर : ‘हनी ट्रॅप’द्वारे भाच्याने घातला मामाला गंडा !

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  रत्नागिरी जिल्ह्यात राहणार्‍या 21 वर्षीय तरूणीचा वापर करीत एका व्यापार्‍याच्या भाच्यानेच मामाचा ‘गेम’ केल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. चक्क मामाला टोपी घालण्यासाठी भाच्याने तरूणीच्या सहाय्याने ‘हनीट्रॅप’चा अनोखा प्रकार केल्याचे उघडकीस आल्याने संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणी राहुरी पोलिसांनी तरूणीसह व्यापार्‍याच्या भाच्याला गजाआड केले आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून अनेकांना भुरळ घालून लुटण्याचे प्रकार वाढले आहेत. व्हाट्सअ‍ॅप, फेसबुक , इन्स्टाग्राम आदी सामाजिक माध्यमातून मैत्रीचे गोंडस नाव वापरत ओळख निर्माण करुन, व्हिडिओ व भेटीमध्ये नको ते कृत्य मोबाईलमध्ये कैद करीत खंडणी मागण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

असाच काही प्रकार राहुरी तालुक्यातील 40 वर्षीय व्यापार्‍याला अशा कटकारस्थानात गुंतविण्याचा प्रयत्न करणार्‍या पुणे येथील तरूण- तरूणीला राहुरी पोलिसांनी गजाआड केले आहे. राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द हद्दीतील रहिवाशी 40 वर्षीय व्यापार्‍याला अनोळखी व्यक्तीने संपर्क साधत क्रडिट कार्ड हवे का, असे विचारले. तरूणीच्या गोड आवाजाची भुरळ पडलेल्या त्या व्यापार्‍याने संपर्कात वाढ केली. सोशल मीडियाद्वारे हाय-बाय सुरू होऊन के्रडिट कार्डच्या नावाखाली पैसे देण्यात आले. के्रडिट कार्ड मिळत नसल्याने व्यापार्‍याने पैशाची विचारपूस केली असता तरूणीने, ‘रक्कम तुम्हाला शिर्डी येथे आल्यानंतर देते,’ असे सांगितले.

दरम्यान, 17 डिसेंबर 2022 रोजी पैसे देण्याच्या बहाण्याने एका लॉजवर बोलावले. संबंधित व्यापार्‍याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तरूणीने प्रसादाच्या नावाखाली गुंगीचे औषध त्या व्यापार्‍याला दिले. लॉजमध्ये नको त्या अवस्थेत चित्रीकरण व छायाचित्र केले. ‘तू लग्न कर किंवा 30 लाख रूपये दे,’ असे म्हणत तरूणीने धमकी देण्याचा कार्यक्रम सुरू केला. घाबरलेल्या व्यापार्‍याने 50 हजार रूपये दिले.
त्यानंतर संबंधित व्यापार्‍याने पैशाची होणारी वारंवार मागणी पाहता राहुरी पोलिस ठाणे गाठत कैफियत मांडली. पो. नि. मेघशाम डांगे व पो. उ. नि. चारूदत्त खोंडे यांनी तपासाची सुत्रे हात छडा लावण्यात यश मिळविले आहे.

कर्ज प्रकरणातही आता ‘हनी ट्रॅप’चा सर्रास प्रयोग

आधार कार्ड नंबर द्या व कर्ज घ्या, अशाही फसव्या योजना सोशल मीडियामध्ये फिरत आहेत. कर्जासाठी अर्ज घेताना पती- पत्नीचे फोटो घेतले जातात. कर्ज दिल्यानंतर अव्वाच्या सव्वा व्याज आकारणी केली जाते. व्याजाबद्दल विचारणा केल्यास धमकी दिली जाते. कर्ज घेतेवेळी दिलेल्या पत्नीचा किंवा पतीच्या फोटोबाबत मोडतोड करीत नको त्या अवस्थेत असलेले फोटो समाज माध्यमामध्ये प्रसारित करण्याची धमकी दिली जाण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

तत्काळ पोलिसांशी संपर्क साधा : पो.नि.डांगे

सोशल मीडियाद्वारे फसवणूक, हनीट्रॅप किंवा पैशाची मागणी होत असेल तर तत्काळ पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करावी. आपली खासगी माहिती, आधार कार्ड, बँक खात्याची माहिती कोणालाही देऊ नये. मोबाईलवरील ओटीपी कोणाला देऊ नये. जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला, श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलिस अधिक्षक स्वाती भोर, पोलिस उपाधिक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलिस प्रशासनाकडून कारवाई केली जात असल्याचे राहुरीचे पोलिस निरीक्षक डांगे यांनी सांगितले.

 

Back to top button