नगर : मैदान मारले आता ‘लेखी’चे वेध ! | पुढारी

नगर : मैदान मारले आता ‘लेखी’चे वेध !

नगर : पुढारी वृत्तसेवा : राज्यात पोलिस भरतीप्रक्रिया सध्या जोरात सुरू असून तरूणाईचा मोठा उत्साह पहायला मिळत आहे. दरम्यान, नगर पोलिस दलात भरती होऊ इच्छिणार्‍या उमेदवारांची मैदानी चाचणीचा शनिवार (दि.14) शेवटचा दिवस होता. विशेष म्हणजे अर्ज करून सुद्धा मैदानी चाचणीला तब्बल 40 टक्के उमेदवारांनी दांडी मारली. मैदानी चाचणीनंतर आता लेखी परीक्षेचे वेध भावी पोलिसांना लागले असून मैदानी चाचणीत पाच हजार 841 उमेदवार पात्र ठरले आहेत. गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर लवकरच लेखी परीक्षा होणार आहे.

राज्यात पोलिस दलाच्या 18 हजार 331 पदांसाठी भरतीप्रक्रिया राबवली जात आहे. त्यासाठी राज्यभरातून 14 लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. एकापेक्षा अधिक ठिकाणी अर्ज केल्याने उमेदवारांच्या अनुपस्थितीचे प्रमाण सर्वत्र सुमारे 40 टक्के आहे. नगर पोलिस दलातील 129 पोलिस शिपाई व 10 चालक पदांसाठी सुरू असलेल्या मैदानी चाचणीत सरासरी 40 टक्के उमेदवार गैरहजर राहिले आहेत. तर सात हजार 607 महिला-पुरूष उमेदवारांनी मैदानी चाचणीला हजेरी लावली असून, त्यापैकी मैदानी चाचणीसाठी पाच हजार 841 उमेदवार पात्र ठरले तर 883 पुरुष-महिला उमेदवार अपात्र ठरल्याची माहिती पोलिस यंत्रणेने दिली .

असा ठरणार मेरिट

मैदानी चाचणीनंतर प्रत्येक रिक्त जागेमागे 10 पात्र उमेदवारांची प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादी केली जाईल. त्यानंतर लेखी परिक्षेचे वेळापत्रक लागणार असून, 100 गुणांची लेखी परिक्षा होणार आहे. लेखी परीक्षेसाठी 90 मिनिटांचा अवधी राहणार असून, मराठी भाषेत परीक्षा होईल. तसेच मैदाणी व लेखीचे गुण एकत्रित करून अंतिम गुणवत्ता यादी तयार होईल.

लेखी चाचणी
100 गुण
अंकगणित
बुध्दिमत्ता चाचणी
सामान्यज्ञान (चालू घडामोडी)
मराठी व्याकरण
मोटार वाहन चालवणे व वाहतूक
(फक्त चालक पदासाठी)

 

मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादी जाहीर होईल. त्यानंतर शिपाई व चालक पदासाठी लेखी परिक्षा आणि चालक पदासाठी कौशल्य चाचणी होईल.
                                            – राकेश ओला, पोलिस अधीक्षक, अहमदनगर

Back to top button