नगर : झेडपीच्या पाच गुरुजींवर संक्रांत ! | पुढारी

नगर : झेडपीच्या पाच गुरुजींवर संक्रांत !

नगर : पुढारी वृत्तसेवा : एकीकडे जिल्ह्यात मुन्नाभाई चर्चेत असताना, आता दुसरीकडे शैक्षणिक क्षेत्रातील डमी गुरुजींचे प्रकरणही चव्हाट्यावर आले आहे. पारनेर आणि संगमनेर तालुक्यातील दोन उपाध्यापकांनी आपल्या जागी मुलांना शिकवायला चक्क रोजंदारीवर तरूणांना ठेवल्याचा धक्क्कादायक प्रकार पुढे आला. विशेष म्हणजे केंद्रप्रमुखही यात रडारवर आहेत. तसेच, मुलींच्या छेडछाडीप्रकरणीही राहुरी व पारनेरचे दोन शिक्षक अडचणीत सापडले आहेत. या पाचही कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील कारेगाव शाळेत रमेश शिवाजी आहेर हे उपाध्यापक म्हणून कार्यरत आहेत. मात्र, त्यांनी आपल्या जागी रोजंदारीवर काम करणार्‍या त्रयस्थ व्यक्तीस मुलांना शिकविण्यासाठी ठेवले होते. याबाबतच्या तक्रारीनंतर अकोलेचे गटविकास अधिकारी यांनी अचानक शाळेला भेट दिली असता, हा प्रकार समोर आला. या प्रकरणात केंद्रप्रमुख असलेले प्रभाकर सखाराम रोकडे यांनी पर्यवेक्षीय कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका प्रशासनाकडून ठेवण्यात आला आहे. तसेच हिवरे कोरडा (मांजरधाव) शाळा, पारनेर या ठिकाणी बाजीराव पानमंद हे शिक्षक आहेत.

त्यांनी आपल्या जागेवर पतसंस्थेचा एक कर्मचारी शिकवणीसाठी ठेवल्याचे गटविकास अधिकार्‍यांच्या प्रस्तावानुसार निदर्शनास आले आहे. तसेच, राहुरीतील निंभेरे शाळेतील मदन दिवे आणि पारनेर तालुक्यातील पाडळी दर्याचे पोपट फापाळे यांच्यावरही छेडछाडीचा आरोप आहेत. त्यामुळे वरील पाचही शिक्षकांवर गटविकास अधिकार्‍यांच्या मार्फत शिक्षण विभागाकडे कारवाईचा प्रस्ताव आला असून, सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून तो सीईओ आशिष येरेकर यांच्याकडे सादर करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून समजली.

शिक्षणाधिकार्‍यांचे चक्रव्यूह; डमी अडकणार !
जिल्ह्यातील कमी पटसंख्या, वस्ती शाळा या ठिकाणी नेमणूक असलेल्या काही गुरुजींवर आता प्रशासनाची विशेष नजर असणार आहे. शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी या संदर्भात तशाप्रकारे चक्रव्यूह आखले असून, यात जर कोणी डमी शिक्षकांना आपल्या जागी उभे करत असेल, तर तो आणि डमी शिक्षकही अडकणार असल्याचे सांगितले जाते.

Back to top button