

कोंभळी : पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या अगोदर कोंभळीमार्गे नगर, कर्जत, जामखेड- कौडाणे या बस सुरू होत्या, मात्र कोरोना काळात बंद होत्या. या एसटी बस अद्याप सुरू न झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. तसेच, शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने बंद एसटी बस पुन्हा सुरू करण्याची मागणी होत आहे. सकाळी सहा वाजता नगर येथून निघणारी कोंभळीमार्गे नगर- कर्जत व कर्जत-नगर, तसेच दुपारी दोन वाजता नगर – कोंभळीमार्गे कर्जत व कर्जत -नगर बस व जामखेड- कौडाने येथे मुक्कामी येणारी बस, दुसर्या दिवशी सकाळी सात वाजता कोंभळी येथून कर्जतमार्गे जामखेडला जाणारी बस बंद आहे. यामुळे विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय होत आहे.
नगर ते कर्जत प्रवास करणार्या प्रवाशांना व विद्यार्थ्यांना या बस सोईस्कर होत्या. यामुळे खंडीत एसटी बससेवा तातडीने सुरू करण्याची मागणी कोंभळी, खांडवी, मुळेवाडी, चांदे परिसरातील नागरिकांनी केली.
नगर-कर्जत व जामखेड-कौडाने एसटी बस सुरू झाल्यास प्रवाशी व विद्यार्थ्यांना होणारा त्रास कमी होईल. त्यामुळे संबंधित आगाराने दखल घेऊन बंद झालेल्या या बस तत्काळ सुरू कराव्यात.
– शीतल मुळे, सरपंच, मुळेवाडी
या एसटी बस बंद असल्याने प्रवाशी व विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरी तारकपूर व जामखेड आगाराने या बस पुन्हा सुरू कराव्यात.
– ज्योती दरेकर, सरपंच, कोंभळी