नगर : 4,117 उच्चशिक्षित पोलिस भरतीच्या रांगेत ; इंजिनीअर, वकील अन् एमएसस्सी पदविधारकांचा समावेश | पुढारी

नगर : 4,117 उच्चशिक्षित पोलिस भरतीच्या रांगेत ; इंजिनीअर, वकील अन् एमएसस्सी पदविधारकांचा समावेश

नगर : पुढारी वृत्तसेवा :  देशात बेरोजगार तरुणांची संख्या मोठी आहे. अनेक तरुण हे उच्चशिक्षित असूनही ते बेकार आहेत. रोजगार मिळत नसल्याने मिळेल ते काम करण्यास ही तरुणाई तयार आहे. सध्या पोलिस भरती सुरू असून या भरतीत इंजिनियर, वकील, एमबीए, एमएस्सी झालेले तरुणही आपले नशीब आजमावत आहेत. नगरमध्ये भरतीप्रक्रियेत चार हजार 117 उच्च शिक्षितांनी अर्ज केला होता. देशात तरुणाईला रोजगार देणे हे सरकार पुढचे मोठे आवाहन आहे. पोलिस होण्याचे स्वप्न बाळगून असलेले तरुण-तरुणी गेल्या वर्षभरापासून पोलिस भरतीचा सराव करत होते. त्यासोबतच माजी सैनिक देखील पोलिस दलात भरती होण्यासाठी सराव करीत होते. नगर शहरातील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर शारीरिक व मैदाणी चाचणी होत आहे.

नगर पोलिस दलातील भरतीच्या 139 जागांसाठी 11 हजारांवर अर्ज दाखल झाले आहेत. यात इंजिनिअर, डॉक्टर, एमबीए, एमएस्सी, बी-टेक, बीबीए, बीएस्सी, एमबीए, एमफार्म शिक्षण घेतलेल्या उच्चशिक्षितांचे प्रमाण मोठे असल्याची आकडेवारी समोर आली आहे. उच्च शिक्षित तरुणांनी देखील अर्ज केल्याने भरती करणार्‍या पोलिसांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे (नगर ) आणि स्वाती भोर (श्रीरामपूर) यांच्या नियंत्रणाखाली सुमारे 400 पोलिस अधिकारी, कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.

113 माजी सैनिकांनी मारले मैदान
पोलिस भरतीसाठी तरूण-तरूणींसोबतच माजी सैनिक देखील मैदानात उतरले आहेत. माजी सैनिकाच्या 18 जागेसाठी 166 अर्ज आले होते. त्यापैकी 123 माजी सैनिकांनी मैदानी चाचणी दिली. त्यापैकी 123 माजी सैनिक मैदानी चाचणीत पात्र ठरले.

आज एक हजार महिला उमेदवारांची चाचणी
नगर पोलिस दलात 39 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहे. यासाठी 2012 महिला उमेदवारांचे अर्ज आले आहेत. महिला उमेदवारांची मैदाणी चाचणी शुक्रवार (दि.13) पासून होणार असून पहिल्या दिवशी 1000 महिला उमेदवारांच्या मैदाणी चाचणीचे नियोजन पोलिस दलाने केले आहे.

Back to top button