नगर : ‘त्या’ खुनाचे रहस्य उकलण्यासाठी प्रयत्न ; ओळख पटेना | पुढारी

नगर : ‘त्या’ खुनाचे रहस्य उकलण्यासाठी प्रयत्न ; ओळख पटेना

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा : नगर-औरंगाबाद महामार्गावर वांबोरी फाट्या नजीक अज्ञात व्यक्तिच्या खुनाचे गूढ उकलण्यात पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. परंतु अद्यापि मृतदेहाची ओळखच पटत नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. शनिवारी (दि.7) नगर-औरंगाबाद रस्त्याच्या बाजूला वांबोरी फाट्याजवळ एका शेतात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. अनोळखी मयत हा पुरुष असून, अंदाजे वय 18 वर्षे आहे. त्यास ज्वलनशील पदार्थाच्या साह्याने पेटवून देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मृतदेह हा प्रवासी बॅगमध्ये घालून, या परिसरात पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने जाळून टाकण्यात आला होता.
या घटनेबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात पोलिस हवालदार रमेश थोरवे यांनी फिर्याद दिली असून अज्ञात आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी पोलिस अधीक्षक राकेश ओला, पोलिस उपअधीक्षक अजित पाटील, पोलिस उपअधीक्षक कातकडे, पोलिस उपअधीक्षक खैरे, स्थानिक गुन्हे शाखेचे अनिल कटके, सहायक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांनी भेट देऊन तपास सुरू केला आहे. खुनाचे रहस्य उकलण्यासाठी पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. महामार्गावरील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर स्रोत वापरून मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मृतदेह जळालेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटविण्यात अडचण येत आहे. प्रकरणाच्या तपासासाठी विविध पथके नियुक्त करण्यात आले आहेत. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर यातील बरेच धागेद्वारे पोलिसांना मिळतील. त्यासाठी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिस सर्वतोपरी प्रयत्नात आहेत. सदर प्रकरणाचा तपास वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य दिशेने सुरू आहे.

 

मृतदेहाची ओळख पटल्यानंतर त्यातील आरोपी निष्पन्न होतील. घटनेबद्दल कोणाला काही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. त्याचे नाव गुपित ठेवले जाईल. तपासासाठी पथके तयार करण्यात आलेली आहेत.
                                           – युवराज आठरे,  सहायक पोलिस निरीक्षक

Back to top button