नगर : सुरक्षा अभियान आयुष्यभरासाठी राबवावे : अभिजीत चौधरी | पुढारी

नगर : सुरक्षा अभियान आयुष्यभरासाठी राबवावे : अभिजीत चौधरी

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : कार्यरत असलेल्या सर्व वाहक चालकाने राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा सुरक्षितता अभियान पंधरवाडा हा केवळ एक दिवसासाठी नव्हे तर आयुष्यभरासाठी साजरा करावा, असे आवाहन आगार प्रमुख अभिजीत चौधरी यांनी केले.
एसटी महामंडळातर्फे सुरक्षितता अभियान पंधरवडा अंतर्गत सडक सुरक्षा जीवन रक्षा सप्ताह 10 ते 25 जानेवारी या कालावधीत साजरा केला जाणार आहे. कोपरगाव एसटी बस आगारात सुरक्षितता मोहीमेच्या उदघाटनप्रसंगी चौधरी बोलत होते. उपनिरीक्षक भरत दाते यांच्या हस्ते करण्यात सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले.

चौधरी म्हणाले, सध्या कोपरगाव आगाराचे दररोजचे सरासरी उत्पन्न सहा लाख रुपये आहे, महिन्याकाठी ते एक कोटी 80 लाख पर्यंत जाते. ज्येष्ठ नागरिक व इतर विशेष बस सेवा मिळून सरासरी 25 कोटी रुपये मिळतात, असे असतानाही विविध नागरी समस्यांना तोंड देत एसटी प्रशासनाला वर्षाकाठी 15 ते 16 कोटी रुपये तोटा होतो तो भरून काढण्यासाठी प्रशासन अनावश्यक खर्चांना आळा घालत आहे. याप्रसंगी विभागीय लेखाधिकारी व पालक अधिकारी वृंदा कंगले, आधार लेखाकर सुनीता गवळी, कार्यशाळा अधीक्षक अमोल बनकर उपस्थित होते.

एसटीलाच पसंती
उपनिरीक्षक भरत दाते म्हणाले, एसटीचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर असल्याने प्रवासी आजही एसटी मधून प्रवास करत आहेत. एसटी चालकांना आवाहन की मद्यपान करू नका, रस्त्यावर आपल्यासोबत प्रवासी, चालणारे नागरिक आणि अन्य वाहन चालकांची सुरक्षिता तुमच्या हाती असल्याने प्रत्येक क्षणाला सतर्क राहून स्वतःसह प्रवाशांची सुरक्षा घ्यावी.

Back to top button