नगर : चांद्याकडे येणारे चारही जोडरस्ते खराब ; बस बंद; विद्यार्थ्यांचे नुकसान, व्यवसायांवर परिणाम

चांदा : पुढारी वृत्तसेवा : नेवासा तालुक्यातील व्यापारी दृष्टीने मह्त्त्वाच्या असणार्या चांदा गावाला येणारे सर्व जोडरस्ते रहदारीस खराब झाले आहेत. त्यामुळे दळण वळणला अडथळा बनल्याने त्याचा परिणाम व्यापारी उद्योग धंद्यावर झाल्याचे पहायला मिळत आहे.
चांदा गावाला लगत असणारे पिंपळगाव, बर्हाणपूर, रस्तापूर, कौठा, हिवरा, शंकरवाडी, फकीर वाडी या परिसरातील वाडी वस्तीवर जाणारे सर्व रस्ते हे अतिशय महत्वाचे आहे. शेतमाल उसवाहतुकीसाठी याच मार्गाचा वापर होतो. तसेच विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठीही हीच मार्ग आहेत. मात्र सध्या ही रस्ते खराब झालेली आहेत.
त्यामुळे चांदा गावावरून जाणारी माका, राहुरी बस बंद झाली. त्यामुळे सोनई येथे शाळेत जाणारे विद्यार्थी, कामगार यांना अडचण येत आहे. तसेच या रस्त्यावर अतिक्रमण, वेड्या बाभळीचे झाडे वाढली आहे. रस्त्यावर मोठी खड्डे पडले आहेत. ऊस वाहतूक करणे अवघड झाले आहे. यातून रस्त्यावर दररोज अपघात वाढले आहेत. दरम्यान, अनेक ठिकाणी कामाच्या नावाखाली रस्ते उखडून ठेवले आहेत. रस्त्याचे कामाचे अनेकवेळा नेतेमंडळी उद्घाटने करून निघून जातात. परंतु प्रत्यक्षात काम काही सुरू होत नाही. काही रस्त्याचे निकृष्ठ काम झालेले आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष घालून काम मार्गी लावावे, अशी मागणी आहे.