नगर : कोरठणच्या वाहतूक नियंत्रणात अपयश | पुढारी

नगर : कोरठणच्या वाहतूक नियंत्रणात अपयश

पारनेर : पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्र व देशभरातील भक्तांचे श्रद्धास्थान असणारे पिंपळगाव रोठा येथील कोरठण खंडोबा यात्रा उत्सव निमित्त लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मात्र या गर्दीवर देवस्थान कमिटीचे तसेच प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागला. वाहतुकीची कोंडी झाल्यामुळे भाविकांना तीन ते चार तासांहून अधिकचा वेळ रस्त्यावरच घालावा लागला.
राज्यातील लाखो भाविकांचे र्शध्दास्थान असलेल्या पिंपळगाव रोठा (ता. पारनेर) येथील कोरठण खंडोबा यात्रेची सांगता मानाच्या काठ्यांच्या शाही मिरवणुकीने झाली. तीन दिवस सुरू असलेल्या यात्रेच्या शेवटच्या दिवशी गर्दीचा महापूर लोटला होता.

लाखो भाविकांनी शेवटच्या दिवशी खंडेरायाचे दर्शन घेतले. या भाविकांमुळे होणार्‍या गर्दीचा अंदाज असूनही वाहतूक नियंत्रित करण्यासाठी देवस्थान कमिटी तसेच पोलिस प्रशासन अपयशी ठरले. त्यामुळेच या गर्दीला कोणत्याही प्रकारे प्रशासन सामोरे गेले नाही. अनेक भाविकांना यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागला. तीन ते चार किलोमीटर अंतर पार करण्यासाठी चार-चार तास भाविकांना प्रतीक्षा करावी लागली. यामुळे भाविकांनी मंदिर प्रशासनाच्या नियोजनावर तोंडसुख घेतले.

पोलिस दलाच्या वतीने दोन कंट्रोल रुम उभारण्यात आल्या होत्या. चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी व्यवस्था स्वतंत्र करण्यात आली होती. परंतु ही व्यवस्था केली असताना पिंपळगाव रोठा येथून प्रशासने केलेल्या व्यवस्थेपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. अनेक भाविकांनी गाड्या रस्त्यावरच लावल्या होत्या. यावर प्रशासनाचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नव्हते. दरम्यान, देवस्थान कमिटी व पोलिस प्रशासनाने भाविकांचे उत्तमरीत्या दर्शन झाले पाहिजे, यासाठी अनेक दिवसांपासून नियोजन केले होते. मंदिर परिसरामध्ये गर्दीवर नियंत्रण व दर्शन रांग यासंदर्भात हे नियोजन होते. परंतु पिंपळगाव रोठा ते देवस्थानपर्यंत तीन ते चार किलोमीटरचा रस्ता अरुंद आहे.
या रस्त्यावरून येण्यासाठी भावीक गर्दी करतील, हा अंदाज प्रशासनाला का आला नाही, असा सवाल भाविकांनी उपस्थित केला आहे.

मंदिरात दर्शन करण्यासाठी फक्त अर्धा तास लागला परंतु दर्शन घेऊन परतत असताना बाहेर पडण्यासाठी चार ते पाच तास गाडीत प्रतीक्षा करावी लागली प्रशासन नियोजन चांगले असते तर भाविकांना हा त्रास सहन करावा लागला नसता
संतोष ठाणगे भाविक

पोलिसांच्या इशार्‍यावरून वाहनांचे नुकसान?

रस्त्यावर दोन्ही बाजूने गर्दी झाली होती. यावेळी एक चारचाकीही रस्त्यावर होती. पोलिसांनी एका बस चालकाला सूचना करताना, घासून गेली तर चालेल, असे सांगितले. त्यामुळे बसच्या धक्याने कारचे नुकसान झाले. तसेच एका दुचाकीला देखील एसटीची धडक बसून नुकसान झाले. हे सर्व पोलिस कर्मचारी यांच्या इशार्‍यानुसार सुरू असल्याचे दिसले.

प्रशासनाचे कागदावरच नियोजन !

प्रशासनामधील अधिकार्‍यांनी कागदावर उत्तम नियोजन केले होते, मात्र प्रत्यक्षात कर्मचार्‍यांवर नेमून दिलेली जबाबदारी पार पाडण्यात कर्मचारी अपयशी ठरले. त्यामुळेच भाविकांना मंदिरापर्यंत पोहोचण्यास तसेच दर्शन घेतल्यानंतर बाहेर पडण्यास सहा तासापेक्षा जास्त कालावधी लागला. अनेक वृद्ध व महिला भाविकांना यामुळे त्रास सहन करावा लागला.

नातेवाईकांच्या व्हीआयपी दर्शनासाठी लगबग
विश्वस्त व देवस्थान कमिटीतील पदाधिकारी आपापल्या नातेवाईक कुटुंबांना व्हीआयपी दर्शन घडवण्यातच व्यस्त होते. सर्वसामान्य भाविकांकडे त्यामुळे दुर्लक्ष झाले. ध्वनीक्षेपकाद्वारे सूचना करणारे यात्रेत होणार्‍या अडचणीतून भाविकांना मदत करण्यापेक्षा येणार्‍या व्हीआयपी भाविकांचे नावे घेण्यातच व्यस्त होते.

Back to top button