वजन कमी करायला गेली अन् खिसा झाला २६ लाखांनी हलका ! | पुढारी

वजन कमी करायला गेली अन् खिसा झाला २६ लाखांनी हलका !

नगर :  पुढारी वृत्तसेवा : बोल्हेगावातील श्रीकृष्णनगरात राहणार्‍या महिलेला वजन कमी करणे चांगलेच महागात पडले आहे. वजन कमी करण्यासाठी उपाय शोधत असताना गुगलवर असलेल्या एका फ्रॉड कंपनीने महिलेची 25 लाख 87 हजार 500 रूपयांनी आरटीजीएस, फोन-पे द्वारे फसवणूक केली आहे. याबाबत महिलेच्या फिर्यादीवरून मोबाईल नंबरधारक व्यक्तीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांत तक्रार दिलेल्या महिलेने वजन कमी करण्यासाठी गुगलवरून माहिती घेतली.

त्यांना इंडीया फीटनेस या कंपनीतून बोलत असल्याचे सांगून एका व्यक्तीने मोबाईलवरून विश्वासात घेतले. वजन कमी करण्यासाठी कंपनीची औषधे देणार असल्याचे फोनवरून सांगितले.  त्याच्या सांगण्यावरून महिलेने 25 लाख 87 हजार 500 रूपयांची रक्कम आरटीजीएस तसेच फोन-पे, गुगल-पे माध्यमातून समोरील व्यक्तीला पैसे पाठविले. महिलेच्या फिर्यादीवरून मोबाईल नंबरधारक व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नितीन रणदिवे करीत आहेत.

Back to top button