नगरमधील वृद्धाची तिघांकडून फसवणूक | पुढारी

नगरमधील वृद्धाची तिघांकडून फसवणूक

नगर : पुढारी वृत्त्तसेवा :  एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या वृद्धाच्या डेबीट कार्डची हातसफाईने अदलाबदली करून चार लाख 23 हजार रूपये काढून घेतल्याची घटना घडली आहे. शहरातील सर्जेपूरा भागातील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये तीन अनोळखी इसमानी मंगळवारी (दि.10) दुपारी वृद्धाची फसवणूक केली. याबाबत नंदकुमार राधेय जगताप (रा. राम मंदिराच्यामागे, पंचवटी कॉलनी, पाईपलाईन रोड) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जगताप हे न्यू आर्टस् कॉलेज मधून सेवानिवृत्त झालेले आहेत.

सर्जेपूरा येथील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी ते गेले. तेथून त्यांनी दोन हजार रूपये काढले. त्यानंतर मागे उभे असलेल्या तिघांनी त्यांना म्हटले की, तुमचे ट्रान्झेक्शन बरोबर झाले नाही, त्यामुळे आम्हाला पैसे काढता येत नाहीत, तुम्ही तुमचे डेबीट कार्ड पुन्हा एटीएममध्ये टाका असे म्हटले. त्यानंतर जगताप यांनी आणखी 500 रूपये काढले. त्यानंतर पुन्हा तीन ते चार वेळा त्यांना एटीएममध्ये डेबीट कार्ड टाकायचे सांगितले.

यादरम्यान जगताप यांचे एटीएम हातचलाखीने बदलून त्यांना दुसरेच कार्ड दिले. काही वेळाने जगताप यांना मोबाईलवर तीन मेसेज आले. त्यातील प्रत्येक मेसेजमध्ये 1 लाख रुपये बँक खात्यातून काढण्यात आल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर पुन्हा त्यांच्या खात्यातून 80 हजार, 30 हजार आणि 13 हजार काढण्याचा मेसेज जगताप यांना आला. तोफखाना पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button