नगर : अवैध वाळू वापर 3.5 कोटींचा दंड !

नगर : अवैध वाळू वापर 3.5 कोटींचा दंड !
Published on
Updated on

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  विना परवानगी गौणखनिजाचा वापर केल्याचा ठपका ठेवत बीओटी तत्त्वावर संगमनेर बसस्थानकाचे काम करणार्‍या ठेकेदाराला महसूल प्रशासनाने साडेतीन कोटीचा दंड केला आहे. संगमनेर हा माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांचा मतदारसंघ असून विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यकाळात हा दंड केला गेला.  ठेकेदाराने परवानगी न घेताच गौण खनिजाचा वापर केल्याची बाब सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांनी माहिती अधिकार कायद्यातून समोर आणली. तहसीलदार अमोल निकम यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकूण घेत ठेकेदार आर. एम. कातोरे यांना दोषी ठरवत 3 कोटी 66 लाख 22 हजार 869 रुपयांचा दंड ठोठावला आहे.

'बांधा वापरा अन हस्तांतरीत करा' या तत्त्वानुसार संगमनेर बसस्थानकाचे बांधकाम करण्यात आले. बांधकाम करतेवेळी 50 कि. मी. अंतरा वरील नदीपात्रातील वाळूचा अधिकृत लिलाव झालेला नव्हता. तरीही ठेकेदार कातोरे यांनी मुळा व प्रवरा या नद्यांच्या पात्रातून उपसा केलेली वाळू बांधकामासाठी वापरली. दगड, मुरुम, डबर व कृत्रिम वाळूही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे वापरल्याची तक्रार खताळ यांनी 11 ऑक्टोबर 2018 रोजी संगमनेर तहसीलदारांकडे केली होती.

तहसीलदार अमोल निकम यांनी खताळ आणि कातोरे या दोघांनाही नोटीसा बजावून म्हणणे सादर करण्यास सांगितले होते. खताळ यांनी पुराव्यांसह म्हणणे सादर केले, तर ठेकेदार कातोरे यांनी गौण खनिज वाहतूक परवाने सादर न करता त्याची बिलेच सादर केली होती.
बसस्थानक बांधकामासाठी 538 ब्रास वाळू, 472 ब्रास मुरुम, 89 ब्रास डबर आणि 724 ब्रास कृत्रिम वाळूचा बेकायदा वापर केला असल्याचे खताळ यांनी माहिती अधिकारात मिळविलेल्या माहितीवरून उघड झाले आहे. बीओटी तत्त्वामुळे मूल्यांकन केले नसल्याचे सांगत ठेकेदार कातोरे यांनी महसूल विभागाकडील प्राप्त तोंडी सूचनेनुसार रॉयल्टी भरल्याचे सांगितले. सुनावणीवेळी ठेकेदार कातोरे यांनी 31 मार्च 2017 व 31 मार्च 2018 चे रॉयल्टी भरल्याचे चलन सादर केले होते. त्याला खताळ यांनी आक्षेप घेतला.

संगमनेर तालुक्यातील पिंपळे येथील खाणपट्टा ठेकेदार कातोरे यांचा नसतानाही त्यांनी त्या खाणपट्याची बिले सादर केली. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाचे कलम 48(7)नुसार अवैधपणे वापर केलेल्या वाळूच्या बदल्यामध्ये 2 कोटी 3 लाख 41हजार रुपये, मुरुम वापरल्यापोटी 8 लाख 40 हजार 652 रुपये, डबर वापरल्यापोटी 10 लाख 48 हजार 244 रुपये आणि कृत्रिम वाळूचा वापर केल्याप्रकरणी 1 कोटी 43 लाख 83 हजार 973 रुपये असा एकूण 3 कोटी 66 लाख 22 हजार 869 रुपये दंड ठेकेदाराला ठोठावला आहे. या निर्णया विरोधात अपीलासाठी कातोरे यांना 60 दिवसांचा वेळ देण्यात आला असल्याचे तक्रारदार अमोल खताळ यांनी सांगितले.

संगमनेरच्या वैभवात भर घालणार्‍या बसस्थानक उभारण्याची संधी मिळाली. दरम्यान धांदरफळ गटाचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. राजकीय द्वेषातूनच मुळ धांदरफळचे रहिवासी असलेले अमोल खताळ यांनी राजकीय इर्षेतून महसूल प्रशासनाची दिशाभूल करत दंडात्मक कारवाई करण्यास भाग पाडले.
                                                           – आर. एम.कातोरे, ठेकेदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news