नगर : 40 वर्षांनंतर सत्तेतून पायउतार झाल्यानंतर लवांडेंचा मोठेपणा, सरपंचांचा केला सन्मान | पुढारी

नगर : 40 वर्षांनंतर सत्तेतून पायउतार झाल्यानंतर लवांडेंचा मोठेपणा, सरपंचांचा केला सन्मान

करंजी : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माजी सरपंच काशिनाथ लवांडे यांना 40 वर्षांनंतर सत्तेतरून पायउतार व्हावे लागले असले तरी त्यांनी ज्येष्ठत्वाचे नाते निभावत नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचांचा साडीचोळी देऊन त्यांचा सन्मान केला. हा तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे. यावेळी त्यांनी गावच्या विकासकामांत सहकार्य करू, असे अश्वासन दिले. निवडणुकीनंतर पहिली मासिक बैठक मंगळवारी सरपंच मुनिफा शेख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसरपंच संगीता नरवडे यांच्यासह सत्ताधारी गटाचे दहा सदस्य व माजी सरपंच काशिनाथ लवांडे यांच्यासह त्यांचे विरोधी गटाचे सहा सदस्य उपस्थित होते.
ग्रामपंचायत कार्यालयात येताच लवांडे यांनी सरपंच मुनिफा शेख व उपसरपंच संगीता नरवडे या दोन्ही सत्ताधारी गटाच्या महिला पदाधिकार्‍यांचा साडीचोळी देऊन सन्मान केला.

यावेळी पदाधिकार्‍यांना काही कान गोष्टी सांगायला लवांडे विसरले नाहीत. ते म्हणाले, तिसगावच्या विकासकामासाठी विरोधाला विरोध न करता प्रामाणिकपणे आमचे सहकार्य राहील. गावचे गावपण टिकविण्यासाठी व आमदार, खासदार, मंत्र्यांकडून निधी आणण्यासाठी गावची बाजारपेठ आणखी वाढवण्यासाठी निश्चितपणे सहकार्याची भूमिका राहील.

..तर रस्त्यावर उतरणार

सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर जर चुकीचे काम करणार्‍यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला अथवा गावातील शांतताप्रिय वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला, तर मात्र रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. कोणावरही अन्याय कदापि सहन करणार नाही, असेही लवांडे यांनी सांगितले.

निवडणूक संपली यापुढे कोणीही राजकीय आकस मनात न
ठेवता तिसगावमध्ये सर्वांना सहकार्य करण्याची भूमिका ठेवावी. त्याचबरोबर येथे येणार्‍या प्रत्येक महिला, मुलीचे संरक्षण करण्यासाठी निश्चितपणे सहकार्य राहील.
                                                          – काशिनाथ लवांडे, माजी सरपंच

Back to top button