नगर : निंबळकच्या महिला सरपंचासह ग्रा.पं. लिपिक लाचेच्या जाळ्यात | पुढारी

नगर : निंबळकच्या महिला सरपंचासह ग्रा.पं. लिपिक लाचेच्या जाळ्यात

नगर : पुढारी वृत्तसेवा :  रस्त्याच्या कामातील बिलाच्या चेकवर सही करण्यासाठी ठेकेदाराला लाचेची मागणी करणार्‍या निंबळक ग्रामपंचायतीच्या सरपंचासह लिपिक लाचेच्या जाळ्यात अडकला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ग्रामपंचायतसमोर लावलेल्या सापळ्यात लिपिकाला 20 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. निंबळक ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रियंका अजय लामखडे आणि लिपिक दत्ता वसंत धावडे या दोघांवर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. निंबळक गावातील निंबळक – लिंगतीर्थ रस्त्याच्या मजबुती करणाचे काम ठेकेदाराने घेतले होते.

रस्त्याच्या कामाचे बिल ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात जमा झाले होते. बिलाचा पहिला चेक देतानाही सरपंचाने सहीसाठी पैसे घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याच बिलातील एक लाख 26 हजाराची रक्कम जीएसटी पोटी ग्रामपंचायतीने राखून ठेवली होती. तक्रारदार यांनी जीएसटी भरल्यानंतर एक लाख 26 हजार रूपये रकमेचा चेकची मागणी ग्रामसेविका यांच्याकडे केली होती. ग्रामसेविका यांनी चेकवर सही केली होती.

दरम्यान, चेकवर सही करण्यासाठी सरपंचाकडून 20 हजारांच्या लाचेची मागणी करण्यात आल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. ग्रामपंचायतीसमोर मंगळवारी (दि. 10) सापळा लावला असता ग्रामपंचायतीचा लिपिक दत्ता वसंत धावडे याला 20 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गहिनीनाथ गमे, पोलिस निरीक्षक शरद गोरडे, कॉन्स्टेबल संतोष शिंदे, विजय गंगुल, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, संध्या म्हस्के, राधा खेमनर, हारून शेख, तागड आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

 

Back to top button