नगर-दौंड महामार्गावर खंडाळ्याजवळ भीषण अपघात | पुढारी

नगर-दौंड महामार्गावर खंडाळ्याजवळ भीषण अपघात

वाळकी; पुढारी वृत्तसेवा : मोटारसायकलवर दोन कॅरेट संत्रा भरून मार्केटला निघालेल्या तरुणाला मागून भरधाव वेगात आलेल्या मुरूमाच्या ढंपरने जोराची धडक दिली. या धडकेत तो उडून रस्त्याच्या खाली जावून पडला. तर, ढंपर प्रचंड वेगात असल्याने तो उलटला आणि 250 फूट घासत जाऊन अगदी रस्त्यावर आडवा झाला. दैव बलवत्तर म्हणून या भीषण अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. नगर-दौंड महामार्गावर खंडाळ्याजवळ सोमवारी (दि.9) पहाटे साडेपाजच्या सुमारास हा अपघात झाला.

गोरख बाबासाहेब बहिरट (वय 23, रा.खडकी, ता.नगर), असे जखमी तरुणाचे नाव आहे. तो मोटारसायकलवर दोन कॅरेट संत्रा भरून नगरला मार्केटला जात होता. खंडाळा शिवारात जिल्हा परिषद माजी सदस्य संदेश कार्ले यांच्या घरा समोर हा अपघात झाला. यावेळी ढंपर उलटल्याने मोठा आवाज झाला. हा आवाज ऐकून संदेश कार्ले, आंनद गायकवाड, प्रवीण कार्ले, पप्पू सुपेकर, अभिषेक काळदाते, आदिनाथ कार्ले, हरी कार्ले, बाळासाहेब पोटघन, विक्रम डोंगरगावे आदींनी त्या ठिकाणी धाव घेत अपघात ग्रस्तांना मदत केली.

ढंपर हा उतारावर उलटल्याने इतर वाहने त्याला धडकून अपघात होण्याची शक्यता असल्याने कार्ले व त्यांच्या सहकार्‍यांनी सकाळी उजाडेपार्यंत रस्त्यावर दोन्ही बाजूला उभे राहून बॅटरीच्या साहाय्याने वाहने थांबवत त्यांना ढंपरवर जावून आदळण्यापासून वाचविले. अन्यथा अनेक अपघात झाले असते, असे संदेश कार्ले यांनी सांगितले.

Back to top button