

अकोले, पुढारी वृत्तसेवा: अवैध धंदे आणि दारूच्या व्यसनापायी गावातील अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. सततच्या भांडणापायी ग्रामपंचायतीने राजूरमधील अवैध धंदे बंद करण्यासोबतच परिसरात दारू विक्री बंदचा ठराव केला. मात्र, पोलिसांच्या वरदहस्तामुळे गावात अवैध दारू विक्री सुरू असल्याने संतप्त झालेल्या दारुबंदी आदोलकांनी राजूर पोलिस स्टेशनच्या ठाणेदारांना निवेदन दिले आहे.
राजूर येथील अवैध दारु विक्री बंद करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेतला. यासंदर्भात राजूर पोलिस स्टेशनशी पत्रव्यवहार करण्यात आला. अकोले तालुका दारुबंदी चळवळीचे हेरंब कुलकर्णी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन दिले आहे. मात्र, तरी देखील पोलिस प्रशासनाकडून गावातील अवैध दारु धंदे बंद करण्यासाठी सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. येत्या आठवड्यापर्यंत संबंधित अवैध धंदे बंद न झाल्यास अकोले तालुका दारुबंदी चळवळीच्या कार्यकर्त्यांकडून तीव्र आंदोलनाचा इशारा पोलिस प्रशासनाला देण्यात आला आहे.
अनेकांचे संसार वाचविण्यासाठी गावातील अवैध धंद्यांसोबतच परवानाधारक दारु विक्री बंदीसाठी राजूर येथील ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने ५ सप्टेंबर २००५ च्या विशेष ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव पारीत केला. या ठरावाची प्रत उत्पादन शुल्क विभाग व जिल्हा पोलिस यंत्रणेला अनेकदा देण्यात आली आहे. मात्र, पोलीस व उत्पादन शुल्क विभागाकडून अद्यापपर्यंत कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. याउलट गावातील अवैध व्यावसायिकांची पोलिस प्रशासनाकडून पाठराखण केली जात आहे.
अकोले तालुक्यातील राजूर गावात दारू बंदी आहे. परंतु अवैध दारू विक्री थांबत नसल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना राजूरला भेट देण्याची विनंती केली आहे. तसेचं दारू विक्रेत्यांवर झालेल्या केसेस एकत्र करून तडीपारीचे प्रस्ताव करावेत. राजूरचे अनेक पोलीस दारू विक्रेत्यांच्या सोबत असल्याने ज्यांच्या बिटमध्ये दारूविक्री होते, त्यांना निलंबित करावे. राजूरमध्ये अवैध दारुला नवीन पोलीस अधिकाऱ्याकडून लगाम बसेल असे वाटले होते, परंतु तसे काही झाले नाही. तसेच आठ दिवसांत राजूरमधली अवैध दारू विक्री बंद न झाल्यास १५ जानेवारीच्या दरम्यान राजूर पोलिस स्टेशनसमोर एक दिवसाचे उपोषण करणार आहोत.
हेरंब कुलकर्णी, प्रनेते, दारुबंदी चळवळ.