जिल्हा नामांतरावर चर्चा होणे गरजेचे : आमदार संग्राम जगताप | पुढारी

जिल्हा नामांतरावर चर्चा होणे गरजेचे : आमदार संग्राम जगताप

नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याचा नामांतराचा वाद आता नव्याने निर्माण झाला आहे. पण, जिल्हा विभाजन झाल्याशिवाय नामांतर नको, अशी भूमिका आपण घेतली आहे. जिल्हा विभाजनाशिवाय दक्षिण भागाचा विकास होणे शक्य नाही. त्यामुळे या मुद्यावर वाद, चर्चा होणे गरजेचे आहे. त्याशिवाय हा विषय सुटणार नाही, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.  पेमराज सारडा महाविद्यालयाने घेतलेल्या राज्यस्तरीय शारदा व ज्ञानेश्वर करंडक वाद स्पर्धेतील विजेत्या संघांना आमदार जगताप यांच्या हस्ते रौप्य करंडक व रोख पारितोषिके देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक होते. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष अ‍ॅड.अनंत फडणीस, महाविद्यालयाचे चेअरमन सुमतीलाल कोठारी, अजित बोरा, सुहास मुळे, प्रा.मधुसूदन मुळे, प्रा.ज्योती कुलकर्णी, प्राचार्या डॉ.माहेश्वरी गावित आदींसह प्राध्यापक, परीक्षक, विद्यार्थी व सहभागी संघ उपस्थित होते.

आमदार जगताप म्हणाले, सर्वत्र सर्वच विषयांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद होत असतात. एखादा निर्णय कितीही चांगला असला तरी, विरोधक छाती ठोकून वाद घालत विरोध करत आपली भूमिका मांडत असतात. आपले म्हणणे प्रभावीपणे कसे मांडायचे, याचे तंत्र शिकविणार्‍या स्पर्धेचे आयोजन करून सारडा महाविद्यालयाने चांगले काम केले आहे. विद्यार्थ्यांना जीवनात निश्चितच ही स्पर्धा उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रा.शिरीष मोडक म्हणाले, महाविद्यालयांमध्ये परीक्षा सुरु असल्या तरीही अनेक महाविद्यालयांचे संघ परीक्षा देऊन या स्पर्धेत सहभागी झाले हेच या स्पर्धेचे मोठे यश आहे. अ‍ॅड.अनंत फडणीस म्हणाले, वक्तृत्व ही उत्कृष्ट कला आहे. विचारांना प्रगल्भता देणारी ही स्पर्धा आहे. महाविद्यालयीन जीवनात अनेकदा अशा स्पर्धांमध्ये सहभागी झाल्यानेच वकिली पेशा स्वीकारला आहे.प्राचार्या डॉ.माहेश्वरी गावित यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रा.राजेंद्र देशमुख यांनी प्रास्ताविक केले. प्रा.जयश्री पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमास उपप्राचार्य मिलिंद देशपांडे, उपप्राचार्य डॉ.मंगला भोसले, पर्यवेक्षक प्रा.डॉ.स्मिता भुसे, पर्यवेक्षक डॉ.सुजित कुमावत, प्रबंधक अशोक असेरी, सहाय्यक सचिव बी. यू. कुलकर्णी आदी उपस्थित होते.

स्पर्धेचा निकाल असा –
ज्ञानेश्वर करंडक – सांघिक प्रथम – अद्वैता सुद्रिक व साक्षी वाघ, अहमदनगर कॉलेज रौप्य करंडक व 5001 रुपये. द्वितीय सिद्धी दुंधव व तनुजा निमसे, जनता विद्यामंदिर कान्हूर पठार रौप्य करंडक व 3001 रुपये. तृतीय शीतल खोडदे व साक्षी कराळे, रुपीबाई बोरा ज्युनिअर कॉलेज रौप्य करंडक व 2100 रुपये. वैयक्तिक पारितोषिके – प्रथम – शीतल खोडदे, द्वितीय – अद्वैता सुद्रिक व तृतीय – साक्षी वाघ, उत्तेजनार्थ – सायली लहाने, स्वराली फलके व साक्षी बर्गे. शारदा करंडक – सांघिक प्रथम – अनिकेत डमाळे व महेश उशीर, न्यू आर्टस् महाविद्यालय नगर, रौप्य करंडक व 5001 रुपये. द्वितीय – रोहन चव्हाण व ओम जाधव, बलभीम महाविद्यालय, बीड, रौप्य करंडक व 3001 रुपये. तृतीय – संध्या गिधाड व नितीन गागरे, रौप्य करंडक व 2100 रुपये. वैयक्तिक पारितोषिके – प्रथम – अनिकेत डमाळे, द्वितीय – रोहन चव्हाण, तृतीय – प्रणाली पाटील.

Back to top button