नगर : सरपंचाच्या पतीकडून तक्रारदाराला धमकी | पुढारी

नगर : सरपंचाच्या पतीकडून तक्रारदाराला धमकी

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील गुंडेगावच्या महिला सरपंचाच्या कुटुंबीयांनी ग्रामपंचायतीच्या जागेत अतिक्रमण करत घर बांधल्याची तक्रार केल्याने जिल्हाधिकार्‍यांनी सरपंच पद रद्द केले. त्याच्या रागातून या महिला सरपंचाच्या पतीने तक्रारदारास शिवीगाळ करत हातपाय तोडण्याची व कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना गुंडेगाव येथे गुरुवारी घडली. याबाबत दादासाहेब राजाराम जावळे (वय 42, रा.गुंडेगाव, ता.नगर) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात शुक्रवारी फिर्याद दिली आहे. जावळे यांनी गावच्या महिला सरपंच मंगल संतोष सकट व त्यांच्या कुटुंबीयांनी ग्रामपंचायतीच्या जागेत अतिक्रमण करत घर बांधल्याची तक्रार जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती.

या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकार्‍यांनी सर्व साक्षी पुरावे पाहून सरपंच मंगल सकट यांचे पद रद्द केले. जिल्हाधिकार्‍यांच्या या निर्णयाविरोधात सकट यांनी नाशिक विभागीय आयुक्तांकडे अपिल केलेले आहे.  या पार्श्वभूमीवर तक्रारदार जावळे हे गुरुवारी सकाळी 10 च्या सुमारास घरासमोर बसलेले असताना, सरपंच पती संतोष लिंबाजी सकट हे तेथे गेले व त्यांनी तक्रार केल्याचा राग मनात धरून जावळे यांना शिवीगाळ केली. तसेच, नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाकडे फिरकल्यास हातपाय तोडण्याची व कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे जावळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी संतोष लिंबाजी सकट याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button