नगर जिल्ह्यातील दहशतीचे राजकारण रोखणार: आमदार बाळासाहेब थोरात | पुढारी

नगर जिल्ह्यातील दहशतीचे राजकारण रोखणार: आमदार बाळासाहेब थोरात

संगमनेर (नगर), पुढारी वृत्तसेवा: संगमनेर तालुक्याचा झालेला सर्वांगीण विकास काहींना पाहवत नाही. त्यांच्याकडून या तालुक्याचा विकास थांबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी महसूलमंत्री असताना कधीच कुणाचे वाईट केले नाही. प्रत्येकाला आपण मदतच केली आहे. मात्र, काही लोक आपले वाईट करायला निघालेले आहेत. जिल्ह्यात काही जण दहशतीचे राजकारण करत आहेत. मात्र, संगमनेर तालुक्यातील जनता एकत्रित येऊन सुरू असलेले दहशतीचे राजकारण रोखणार असल्याचा इशारा माजी महसूल मंत्री आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिला.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने गौण खनिजावर बंदी आणली आहे. त्यामुळे संगमनेरमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. त्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात निळवंडे कालव्यांसाठी मोठा निधी मिळवून 2022 मध्येच पाणी देण्याचे आपले स्वप्न होते. मात्र, सरकार बदलले आणि निळवंडे कालव्यांचे काम पूर्णपणे थांबले. याचबरोबर विविध विकास कामांनाही स्थगिती मिळाली.

राज्यातील अहमदनगर जिल्ह्यात खासकरून संगमनेर तालुक्यात महसूल विभागाने गौण खनिजाच्या नावावर अन्यायकारक निर्बंध लावले आहेत. यामुळे अनेक शासकीय विकास कामांसह, विविध रस्ते, सरकारी इमारती , घरकुल शाळा, खोल्या, अंगणवाडी या सरकारी कामाबरोबरच अनेक लोकांच्या घरांची कामेही थांबली आहेत. महसूल विभागाने बेकायदेशीररित्या अनेकांना बेकायदेशीर दंड केले आहेत. यामुळे अनेकांचे प्रपंच उघड्यावर आलेले आहेत. हे सर्व जाणीवपूर्वक केले जात असल्याचे थोरात यांनी सांगितले.

Back to top button