…येथे उघडला लेकींच्या सन्मानाचा दरवाजा | पुढारी

...येथे उघडला लेकींच्या सन्मानाचा दरवाजा

चांदेकसारे : पुढारी वृत्तसेवा :  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती बालिकादिनानिमित्ताने कोपरगाव तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा कारवाडी (मंजूर) शाळेत ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ अभियानांतर्गत ‘करु या, सन्मान लेकीचा’ हा ऐतिहासिक उपक्रम पार पडला.
क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन उपक्रमास प्रारंभ झाला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिक्षणाची दारे खुली करून दिली. अन सावित्रीच्या लेकींनी सर्व क्षेत्र पादाक्रांत करत आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे. तरीही मुला मुलींमध्ये समाज भेद करताना दिसून येतो. सबंध विश्वातील क्षेत्रांत तीने भरारी घेऊन सुध्दा स्त्रिकडे अबला म्हणूनच बघीतले जाते.

वंशाच्या दिव्यापायी कित्येक कळ्या उमलण्या अगोदरच खुडल्या जात आहेत. यासाठी शासनस्तरावर भगीरथ प्रयत्न सुरु आहेत. त्यास अनुसरून ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ अभियानांतर्गत स्त्री जन्माचे स्वागत सन्मान करणारा शिक्षणातून समतेकडे घेऊन जाणारा ‘करु या, सन्मान लेकीचा हा ऐतिहासिक उपक्रम आज जि.प.प्राथमिक शाळा कारवाडी (मंजुर) शाळेत मोठ्या उत्साहात झाला. लेकीचे महत्व सांगणार्‍या गीतांच्या निनादत प्रभात फेरी सन्मान सोहळ्यास प्रारंभ झाला. ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ , ‘मुलगा मुलगी एकसमान, दोघांनाही शिकवा छान’ अशा नानाविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. सहावार नऊवार साड्या परिधान केलेल्या डोक्यावर तुळशी घेतलेल्या चिमुकल्या लेकी सोहळ्याचे नेतृत्व करत होत्या. त्यामागे ढोलपथक लेझीम पथक तालधरुन चालत होते. लेकीच्या स्वागतासाठी त्यांच्या घराचे अंगण सडारांगोळीने सजले होते. दाराला तोरण घरांवर लेकींच्या सन्मानाच्या गुढ्या उभारल्या होत्या. सोहळा ज्या लेकीच्या घरासमोर पोहचला तेथे लेकीचे आईवडील तिचे स्वागत करत होते.

याप्रसंगी माजी जि. प. सदस्य सुधाकर दंडवते, नामदेव खुळे (अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती), साईनाथ कोकाटे (शिक्षण तज्ज्ञ शा.व्य. समिती), जनार्दन शिंदे उपस्थित होते. उपक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सुभाष पायमोडे, सीताकांत खांडगौरे, किरण निंबाळकर, बबन काळे, नामदेव सोनवणे, आशा पठाण, रजिया शेख, गोरक्ष बढे, नारायण कवडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Back to top button