नगर : पकडलेली वाळू नष्ट करीत गोण्या पेटवल्या | पुढारी

नगर : पकडलेली वाळू नष्ट करीत गोण्या पेटवल्या

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर शहरातील गंगामाई घाट परिसरात प्रवरा नदी पात्रातून उपसा करून कालबाह्य झालेल्या रिक्षांद्वारे वाळू वाहतूक करताना तहसीलदारांच्या पथकाने धरपकड करीत अवैधरित्या वाळूची वाहतूक करणार्‍या दोन रिक्षा पकडल्या. दरम्यान, रिक्षात भरलेल्या वाळूच्या गोण्यांमधील वाळू नदीपात्रात खाली करून देऊन खराब होण्या जाळून नष्ट केल्या. संगमनेर शहरातील गंगामाई घाट परिसरासह प्रवरा, मुळा, आढळा आणि म्हाळुंगी नदीपात्रातील विविध भागांतुन होणार्‍या वाळू उपशावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्या आदेशान्वये ट्रॅक्टर, ढंपर, पिकअप, ट्रक, हायवा जे.सी.बी. यातून होणारी अवैध वाळू वाहतूक व उपसा बंद करण्यात आला आहे. सध्या सर्वत्र वाळू तस्करी बंद आहे. तरीसुद्धा अनेक वाळू तस्कर आता तर नवीन फंडा वापरुन कालबाह्य झालेल्या रिक्षा, बैलगाड्या व गाढवांच्या मार्फत अवैधरित्या वाळूची वाहतूक करत असल्याचे दिसत आहे.

प्रवरा नदी परिसरातील गंगामाई घाटाच्या पायर्‍यांलगत वाळू उपसा करीत होते. त्यामुळे येथील पायर्‍या खचत चालल्या होत्या. मोठ-मोठे खड्डे पडले होते. त्यात अनेकांचा जीवही गेलेला आहे. त्यामुळे या परिसरात होणार्‍या वाळू उपशावर निर्बंध लावावे, अशी मागणी वारंवार महसूल व पोलिसांकडे केली जात होती. तरीसुद्धा अवैधरित्या वाळू उपसा सुरुच होता. गंगामाई घाट, संगमनेर खुर्द येथे रिक्षातून अवैध वाळू उपसा केला जात असल्याचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे व तहसीलदार अमोल निकम यांच्या महसूल पथकाला कळाले होते. या पार्श्वभूमीवर कारवाई करण्यात आली.

रिक्षा लवकरच स्क्रॅप करुन त्यांचा लिलाव..!

महसूल विभागाने या अगोदरही वाळू तस्करांच्या अनेक रिक्षा जप्त करुन तस्करांवर गुन्हे दाखल केले आहे. मागील दोन दिवसांसत तीन वाळू तस्करांना हद्दपार करण्यात आले आहे. अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, जप्त केलेल्या सर्व रिक्षा लवकरच स्क्रॅप करुन त्याचा लिलाव करण्यात येणार असल्याचे तहसीलदार अमोल निकम यांनी दैनिक पुढारी बोलताना दिली.

Back to top button