संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर शहरालगत मोठा विस्तार असलेल्या गुंजाळवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत कचरा गोळा करण्यास घंटागाडी नसल्याने उपनगरांमध्ये कचराकुंडीतील कचरा उचलला जात नसल्याने तो परिसरात अस्ताव्यस्त पसरल्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटली आहे. आरोग्यादृष्टीने या गंभीर बाबीकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. संगमनेर शहरासह आसपासच्या परिसराचाही झपाट्याने विकास होत आहे. यात सर्वाधिक कर आकारणारी ग्रामपंचायत म्हणून गुंजाळवाडीची ओळख आहे.
याच ग्रामपंचायतीच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात वसाहती निर्माण होत आहे, मात्र येथील रहिवाश्यांना मुलभूत सुविधा पुरविल्या जात नाही. या ग्रामपंचायतीच्या हद्दीत ऐश्वर्या पेट्रोल पंपामागे ओंकार व वेदांत वसाहत, केशव नगर, राहणे मळा गोल्डन सिटी या भागात अनेक सुशि क्षित नागरिक राहतात. या सर्वच उप नगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचर्याचे ढिग पडलेले दिसत आहेत.
या परिसरात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरांसह भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. साप, उंदीर, डासांच्या भितीने नागरिक त्रस्त झाले आहेत. यात कचर्याची दुर्गंधी पसरल्यामुळे साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. गुंजाळवाडी ग्रामपंचायत प्रशासनाने या नागरी समस्येकडे लक्ष देऊन कचर्यापासून सोडवणूक करावी, अशी मागणी परिसरातील महिलांनी केली आहे. गुंजाळवाडी ग्रामपंचायत हद्दीत कचर्याचा प्रश्न गहण झाला आहे. या प्रश्नावर चर्चा करण्यास गट विकास अधिकारी अनिल नागणे यांनी गुंजाळवाडी ग्रामपंचायतीस भेट देऊन उपनगरातील कचर्याची विल्हेवाट लावण्याबाबत सूचना केल्या.
यावेळी कचर्याची विल्हेवाट लावण्यास जागा उपलब्ध नसली तरी लवकर ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून कचर्याची विल्हेवाट लावावी, अशा सूचना अनिल नागणे यांनी ग्राम पंचायत प्रशासक कासार व ग्रामविकास अधिकारी आहेर यांना दिल्या आहेत.
संगमनेर शहरालगत गुंजाळवाडी, घुलेवाडी, सुकेवाडी व कासारवाडी या 3 ग्रामपंचायती विस्ताराने सर्वात मोठ्या आहेत. या ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात उपनगरे तयार झाली. येथील गोळा केलेला कचरा घंटागाड्यांच्या माध्यमातून वाहून त्याचे विलगिकरण करून त्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प तयार करण्याचे काम पंचायत समितीच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने हाती घेण्यात येणार आहे.
– अनिल नागणे, संगमनेर पंचायत समिती, गट विकास अधिकारी