एस.टी. च्या शौचालयामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : नेवासा बसस्थानकाच्या शौचालयामुळे शेजारील शाळेतील मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. एसटीच्या अधिकार्यांनी तातडीने गांभीर्याने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. नेवासा एसटी बसस्थानकाच्या आवारात मोठ्या प्रमाणात प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने शौचालय बांधण्यात आले आहे. पंरतु या शौचालयाच्या टाक्यांचे काम व्यवस्थित झाले नसल्याने या शौचालयाच्या टाक्यांमधून घाण पाणी शौचालयामागील आवारात साचत आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत असल्याने प्रवाशांना तसेच शेजारच्या नागरिकांना त्रास होत आहे. याच शौचालयाजवळच इंग्लिश मीडियम शाळेतील लहान मुलांचे वर्ग आहेत. दिवसभर शाळा असल्यामुळे मुलांसह सर्वांनाच दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. शाळेतील शिक्षकांनाही या शौचालयाच्या दुर्गंधीमुळे मुलांना शिकवता येत नाही.
संबधित शाळेने तीन-चार वेळेस एसटीच्या अधिकार्यांना लेखी तक्रार केली आहे. परंतु एसटीच्या मनमानी कारभारामुळे याकडे दुर्लक्ष केले आहे. येथील शौचालयाच्या कामांची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या दुर्गंधीने मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मुलांना शाळेत पाठवू की नाही, असा प्रश्न पालकांना पडला आहे. एसटी महामंडळाने
शाळेला होत असलेल्या शौचालय दुर्गंधीचा बंदोबस्त करण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे.
मुलांसह आंदोलन करणार : प्राचार्य बत्तीसे
एसटी बसस्थानकाशेजारीच एसटीचे शौचालय आहे. शौचालयाच्या दुर्गंधीने आता कळस केला आहे. शाळा कशी चालवावी. एसटीकडे अनेकवेळा लेखी तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने आता मुलांना घेऊन एसटी बस स्थानकासमोर आंदोलन करण्याचा इशारा प्राचार्य रावसाहेब बत्तीसे यांनी दिला.