

नगर : पुढारी वृत्तसेवा : रेखा जरे हत्याकांडातील दहा आरोपींवर आरोप निश्चित झाली असून इतर दोन आरोपींवर आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, आरोपी आदित्य चोळके व सागर भिंगारदिवे यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अर्ज केला आहे. या खटल्याची पुढील सुनावणी शनिवारी (दि.7) होणार आहे. जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठे याच्यासह दहा आरोपींवर आरोप निश्चित झाले आहेत. तर, दोन आरोपींवरील आरोप निश्चितीची प्रक्रिया अद्यापही बाकी आहे. या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी यांच्या न्यायालयासमोर सुरू आहे.
बुधवारी (दि. 4) पार पडलेल्या सुनावणीत जनार्दन अकुला चंद्राप्पा या आरोपीच्या वकिलाने आरोप निश्चित होण्यावर शनिवारपर्यंत मुदत मागितली होती. न्यायालयाने शनिवारपर्यंत आरोप निश्चित होण्याच्या प्रक्रियेवर युक्तिवाद करण्यासाठी मुदत दिली. तर, आरोप निश्चित होणे बाकी असलेली महिला आरोपी पी. अनंतलक्ष्मी फरार आहे. न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपी आदित्य चोळके व सागर भिंगारदिवे यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर शुक्रवारी (दि. 6) उच्च न्यायालय सुनावणी होणार होणार आहे. या खटल्याचे कामकाज राज्याचे विशेष सरकारी वकील अॅड. उमेशचंद्र यादव पाटील पाहत असून त्यांना अॅड. सचिन पटेकर सह्या करीत आहेत.
नगरमध्ये मीडिया ट्रायल होत असल्याने खटला नाशिक किंवा ठाणे येथील न्यायालयात चालविण्याची मागणी आरोपी बाळ बोठे याने औरंगाबाद खंडपीठात केली आहे. तसेच, नगरमध्ये सुनावणी झाल्यास जीवितास धोका असल्याचेही बोठे याने अर्जात म्हटले आहे. या अर्जावर येत्या 23 जानेवारी रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती अॅड. पटेकर यांनी दिली.