नगर : आत्मनिर्भर होण्यासाठी जिल्हा विभाजन आवश्यक | पुढारी

नगर : आत्मनिर्भर होण्यासाठी जिल्हा विभाजन आवश्यक

नगर : पुढारी वृत्तसेवा : दक्षिण नगर जिल्ह्याचा बहुतांश भाग दुष्काळी आहे. या भागाचा सर्वागिण विकास व्हावा, तसेच येथील जनता व शेतकरी आत्मनिर्भर होण्यासाठीच अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन आवश्यक असल्याचा टोला आमदार संग्राम जगताप यांनी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना लगावला.  शहरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करण्याची गरज नसल्याचे खासदार डॉ. सुजय विखे यांच्या वक्तव्याकडे त्यांचे लक्ष वेधले असता, आमदार जगताप म्हणाले की, नगर जिल्हा उत्तर विभागात तीन धरणे आहेत. प्रशासकीय कामासाठी श्रीरामपूर येथे अपर पोलिस अधीक्षक व उपप्रादेशिक कार्यालये आहेत.

एकंदरीत उत्तर विभाग सर्वच दृष्टिने सुजलाम सुफलाम आहे. या उलट दक्षिण नगर जिल्ह्यातील बहुतांश तालुके दुष्काळी आहेत. प्रशासकीय यंत्रणेत अधिकारी व कर्मचार्‍यांची कमतरता आहे. शेतीसाठी धरणे नाहीत. अशा परिस्थितीत अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करुन नवीन दक्षिण जिल्हा निर्माण करण्यात यावा. नवीन जिल्हा निर्माण झाल्यास नवीन धरणे बांधून शेती फुलवली जाईल. दक्षिण जिल्ह्यासाठी नवीन विकास आराखडा तयार करु आवश्यक तेवढा निधी उपलब्ध होईल. त्यामुळे आवश्यक कर्मचारी आणि कार्यालये निर्माण झाल्यास जिल्हा विकासकामाला आणि प्रशासकीय कामकाजाला गती येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार दक्षिण भागातील शेतकरी आत्मनिर्भर होतील, असा टोला आमदार जगताप यांनी खासदार विखे पाटील यांना लगावला.

दरम्यान, नगर शहरातील अनेक रुग्णालये व अत्यावश्यक सेवा देणार्‍या संस्थांचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे नागरिकांना अत्यावश्यक सेवा देताना विविध अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास व आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला. तरी शहरासह जिल्ह्यातील खंडित झालेला वीजपुरवठा त्वरित सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी दुपारी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे केली.

…तर जिल्ह्याच्या नामांतराला पाठिंबा

जिल्हा विभाजनाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. विभाजनानंतर अहमदनगर शहराला कोणते नाव द्यावे, याचा विचार करणे गरजेचे आहे. खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी व जनता जनार्धन यांनी एकमुखी नाव ठरवावे, त्या नावाला आपला पाठींबा राहणार असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी आवर्जून नमूद केले.

Back to top button