नगर : श्रीगोंदा, पारनेर, अकोलेतील शिक्षक पगाराविना | पुढारी

नगर : श्रीगोंदा, पारनेर, अकोलेतील शिक्षक पगाराविना

नगर : पुढारी वृत्तसेवा :  श्रीगोंदा, पारनेर आणि अकोले या तीन तालुक्यातील तीन हजारांपेक्षा अधिक शिक्षकांचे नोव्हेंबरचे पगार अद्यापही जमा झालेले नाहीत. त्याला शिक्षक बँकेच्या निवडणुकीची झालर असून, पराभूत मंडळातील गुरुजींकडूनच पगार बिले जाणीवपूर्वक उशीरा काढून, राजकीय सूड उगवला जात असल्याचा आरोप काही शिक्षकांमधूनच होऊ लागला आहे.  जिल्ह्यात 11 हजार शिक्षक आहेत. या शिक्षकांच्या बँकेची ऑक्टोबरमध्ये निवडणूक झाली. निवडणुकीला तीन महिने उलटली असली तरी बँकेच्या निवडणुकीची धग अजूनही कायम असल्याचे दिसून येते. काही संघटनांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक पगार बिले उशीरा काढून मते न टाकणार्‍या शिक्षकांना वेठीस धरण्याचे प्रकार सुरू असल्याचे काही शिक्षकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

श्रीगोंदा, पारनेर, अकोले या तीन तालुक्यातील तीन हजारापेक्षा अधिक गुरुजींना जानेवारी उजडला तरीही नोव्हेंबर महिन्यातील पगार  अद्याप मिळालेला नाही. पगार नसल्याने गुुरुजींना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गृहकर्जाचे हप्ते वेळेत न गेल्याने व्याजाचा भुर्दंड आकारला जात आहे. त्यामुळे शिक्षकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शाळेत ज्ञानदान करणार्‍या गुरुजींना पगार बिलासाठीच कोणाला व किती दान करावे लागते, याची कुजबूज सुरू झाल्याचे समजते.

शिक्षक संघटना मते घेण्यापुरत्याच..!

ज्या शिक्षकांकडे बँकेच्या सत्तेसाठी मतांची मागणी केली, त्या संघटना निवडणुकीनंतर शिक्षकांना विसरल्या आहेत. काही संघटना अधिवेशन घेण्यात व्यस्त आहेत,तर काही बँकेच्या सत्तेत मस्त आहेत. मात्र दर महिन्यालाच काही तालुक्यांचे पगार बिले वेळेत पाठविले जात नाहीत, ग्रॅण्डही कमी येते, या प्रश्नांवर सर्वच संघटनांनी मौन धरल्याचे दिसते.

गुरुजींच्या पगारासाठी महिन्याला 90 कोटी

जिल्ह्यात 11 हजार 500 शिक्षक आहेत. त्यांच्या पगारासाठी 90 कोटींची मागणी जिल्हा परिषदेतून केली जाते. मात्र शासनाकडून दरमाह 70/75 कोटी रुपये येतात. त्यामुळे ज्या तालुक्यांची बिले अगोदर जिल्हा परिषदेत येतात, त्यांची पगार होतात. मात्र जी बिले उशीरा येतात, त्यांना पैसे शिल्लक राहत नसल्याने त्यांचे पगार मागे राहतात, अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली.

 

Back to top button