नगर : मुळाच्या आवर्तनाला ‘आचारसंहितेचे ग्रहण’ | पुढारी

नगर : मुळाच्या आवर्तनाला ‘आचारसंहितेचे ग्रहण’

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  मुळा धरणाच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला मुहूर्त लाभेनासा झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर कालवा सल्लागार समितीची बैठक होणार असल्याची चर्चा होत असतानाच पदवीधर निवडणुकीच्या आचारसंहितेचा अडसर निर्माण झाला आहे. शासकीय स्तरावर बैठक होऊन आवर्तन निश्चिती होणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून मिळाली आहे. मुळा धरणात गेल्या तीन ते चार वर्षांपासून समाधानकारक पाणीसाठा जमा होत आहे. परिणामी शेतकर्‍यांना मुबलक पाणी पुरवठा होत असल्याने शेती सिंचनाच्या समस्या कमी झाल्या आहेत.

मान्सून हंगामात पावसाचा अधिक वर्षाव पाहता धरण यंदाही पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. धरणामध्ये जवळपास 98.50 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने मुळा पाटबंधारे विभाग डावा व उजव्या कालव्याला आवर्तन कधी सोडणार? याकडे शेतकरी चातकाप्रमाणे नजरा लावून बसलेला आहे. दरम्यान, मुळा पाटबंधारे विभागाची आवर्तन निश्चिती व धरणाच्या पाण्याच्या नियोजनाबाबत कालवा सल्लागार समितीची बैठक होणे अत्यंत गरजेचे होते. मंत्रालयीन स्तरावर पालकमंत्री तथा राधाकृष्ण विखे पाटील व लाभार्थी मतदारसंघाचे प्रतिनिधी व सदस्यांची एकत्रित बैठक होऊन पाण्याचे नियोजन ठरविले जाते.

मुळा कालवा सल्लागार समितीची बैठक डिसेंबर महिन्यातच होणार असल्याची माहिती मिळाली होती. परंतु संबंधित महिन्यामध्ये 20 डिसेंबर पर्यंत ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेचा अडसर आल्याने कालवा सल्लागार समितीची बैठक पुढे ढकलण्यात आली होती. मागील वर्षांतील शेवटच्या सप्ताहामध्ये कालवा सल्लागार समितीची बैठक घेण्याबाबत पाटबंधारे विभागाने पूर्ण उपाययोजना केल्या होत्या. कागदोपत्री तयारी होऊन मुळा धरणामध्ये 25 हजार 500 दलघफू पाणी साठा आहे. रब्बी हंगामात एक तर उन्हाळी हंगामात दोन आवर्तने देण्याबाबत निश्चित झालेले आहे. संबंधित आवर्तन कालावधी निश्चित करण्याबाबत कालवा सल्लागार समितीची बैठक होणे गरजेचे होते. परंतु बैठकच होत नसल्याने शेतकर्‍यांचे नियोजन कोलमडले आहे. मुळा पाटबंधारे विभागाकडून डाव्या कालव्यासाठी रब्बीसाठी 1 तर उन्हाळी हंगामात 3 आवर्तने देण्यात येणार आहे. या आवर्तनामध्ये डाव्या कालव्यातून प्रत्येकी 400 दलघफू पाणी शेतकर्‍यांसाठी सोडले जाणार आहे.

शेतकर्‍यांची मागणी वाढली : पाटील

मुळा पाटबंधारे विभागाकडे सुमारे 30 टक्के शेतकर्‍यांनी आवर्तनाची मागणी केली आहे. शेतकर्‍यांचे हित लक्षात घेता शासकीय स्तरावर दोन ते तीन दिवसातच बैठक होऊन मुळा धरणाचे पाणी नियोजन व आवर्तन निश्चिती जाहिर केली जाणार असल्याची माहिती मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी सांगितले.

Back to top button