नगर : चार वर्षांनंतरही तुकाई योजना कोरडीच !

नगर : चार वर्षांनंतरही तुकाई योजना कोरडीच !

कोंभळी : पुढारी वृत्तसेवा :  विधानसभा निवडणुकीत केंद्रबिंदू ठरत असलेली, तसेच कर्जत तालुक्यातील हजारो शेतकर्‍यांच्या आशेचा किरण असलेल्या तुकाई उपसा सिंचन योजनेला प्रशासकीय मान्यता मिळून आता चार वर्षे झाली आहेत. तालुक्याला दोन-दोन आमदार लाभूनही योजनेचे काम अर्धवट आहे. त्यामुळे ही योजना चार वर्षे झाली तरी कोरडीच आहे.  तुकाई उपसा सिंचन योजनेला 3 जानेवारी 2019 रोजी मंत्रिमंडळाने प्रशासकीय मान्यता दिली. माजी मंत्री आमदार प्रा. राम शिंदे यांनी निवडणूक समोर ठेवून या योजनेचे दिमाखात उद्घाटन केले. 2 मार्च 2019 रोजी काम करण्यासाठी संबंधित एजन्सीला कार्यारंभ आदेश देऊन कामास सुरुवात झाली. मात्र, दोन वर्षे असलेला कामाचा कालावधी उलटून गेला.

चार वर्षे होत आले तरी योजनेचे घोंगडे अजूनही भिजतच आहे. तुकाई योजनेच्या कामाच्या आठ गावांच्या ठिकाणी वनविभागाची हद्द येत असल्याने येथील वन्यजीवच्या परवानग्या अजूनही मिळाल्या नाहीत. त्यामुळे 28 गावांच्या तलावांना जोडणार्‍या वितरण नलिकांचे काम बंद आहे. त्यामुळे योजनेचे पाईप धूळखात पडले आहेत. वितरण कुंडाचे कामही अर्धवट आहे. योजनेचे पंपगृह उभारण्यासाठी तालुक्यातील शिंदे गावातील भूसंपादन करण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. मात्र, भूसंपादनाचा मोबदला कमी मिळत असल्याने येथील शेतकर्‍यांचा भूसंपदानास विरोध होत असल्याने भूसंपादन प्रक्रियाही रखडली आहे. शिंदे येथे पंपगृहाची सुमारे एक हेक्टर जागेची आवश्यकता आहे.

अवर्षणग्रस्त कर्जत तालुक्यातील या उपसा सिंचन योजनेमध्ये एकूण 20 पाझर तलाव व 3 लघुपाटबंधारे तलावांचा समावेश होता, त्यानंतर या योजनेत आमदार रोहित पवार यांनी पाठपुरावा करून अतिरिक्त 4 पाझर तलावांचा समावेश केला.
या योजनेद्वारे 115 दशलक्ष घनफूट पाण्याचे आरक्षण करण्यात आले. एकूण 28 गावांमधील 599 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचे व पिण्याच्या पाण्याचे नियोजन आहे. त्यासाठी 61 कोटी तीन लाख रुपये इतक्या खर्चाची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
तसेच, अतिरिक्त चार पाझर तलावांचा समावेश करून तीन कोटी 55 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली.

या गावांचा योजनेत समावेश

योजनेत बिटकेवाडी, खुरंगेवाडी, वालवड, सुपा, बहिरोबावाडी, चांदे खुर्द, चांदे बुद्रुक, मुळेवाडी, दगडवाडी, चिंचोली काळदात, गुरवपिंपरी, टाकळी खंडेश्वरी, थेटेवाडी, डिकसळ, गोंदर्डी, रेहकुरी, गोयकरवाडी, खंडाळा, वाघनळी आदी गावांचा समावेश आहे.

योजना सुरू होण्याची शेतकर्‍यांना प्रतीक्षा

तुकाई उपसा सिंचन योजनेत काही ठिकाणी वितरण नलिका टाकण्यात आल्या असून, पंप गृह, वितरण कुंड, नियंत्रण कक्ष, वनविभागाच्या हद्दीतील वितरण नलिका अशी कामे अजून बाकी आहेत. ही योजना प्रत्यक्षात कधी सुरू होतेस याची प्रतीक्षा शेतकर्‍यांना लागली आहे.

राजकीय स्वार्थासाठी आमदार राम शिंदे यांनी योजनेचे काम घाईगडबडीत मंजूर करून आणले होते, त्यासाठी लागणार्‍या कोणत्याही परवानग्या व इतर बाबींची पूर्तता करण्यात आली नव्हती. आमदार रोहित पवार यांनी या योजनेसाठी लागणार्‍या परवानग्या व भूसंपदानासाठी लक्ष घालून पाठपुरावा केल्यामुळे हे काम लवकर सुरू होईल.
                   – सतीश लाघुडे,  जिल्हा सरचिटणीस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news