नगर : पोलिस भरतीला 396 जणांची दांडी | पुढारी

नगर : पोलिस भरतीला 396 जणांची दांडी

नगर : पुढारी वृत्तसेवा : दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पोलिस भरतीसाठी आज शिपाई पदाच्या भरतीसाठी एक हजार उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलविण्यात आले होते. प्रत्यक्षात 604 उमेदवारांनी हजेरी लावली. उंची व छाती फुगविण्यात 83 उमेदवार अपात्र ठरले तर, 521 जणांनी चाचणी दिली. पहिल्याच दिवशी 396 जणांनी मैदानी चाचणीला दांडी मारली. जिल्हा पोलिस दलामध्ये शिपाई पदाच्या 139 जागा भरतीसाठी 12 हजार 334 अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्ज केलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी सोमवारपासून सुरू झाली आहे. 2 व 3 जानेवारीला पोलिस चालक पदासाठी मैदानी चाचणी घेण्यात आली. बुधवारी पोलिस शिपाई पदाच्या 129 जागेसाठी चाचणीला सुरूवात झाली आहे. प्रत्येक दिवशी एक हजार मुलांना चाचणीसाठी बोलविण्यात आले आहे.

पोलिस मुख्यालयातील मैदानावर चाचणी सुरू असून, 1600 मीटर धावण्यासाठी अरणगाव शिवारात व्यवस्था केली आहे. उमेदवारांच्या जाण्या-येण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. स्वत: पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, गृह शाखेचे पोलिस उपअधीक्षक (गृह) कमलाकर जाधव, पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार संपूर्ण भरती प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. पहाटे पाच वाजता उमेदवारांना मैदानात प्रवेश दिला असून, कागदपत्रांची पडताळणी केली जाते. त्यानंतर छाती आणि उंचीचे मोजमाप करून अपात्र उमेदवारांना बाहेर काढले जाते. तर, पात्र उमेदवारांची गोळा फेक, 100 मीटर धावणे, 1600 मीटर धावणे अशी चाचणी घेतली जात आहे. गुरुवारी पुन्हा एक हजार उमेदवारांना चाचणीसाठी बोलविण्यात आले आहे.

Back to top button