संगमनेर बस स्थानकामध्ये पोलिस चौकी सुरू | पुढारी

संगमनेर बस स्थानकामध्ये पोलिस चौकी सुरू

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  संगमनेर बस स्थानकामध्ये वाढत्या चोर्‍या आणि पाकीटमार आणि ग्रामीण भागातून येणार्‍या महाविद्यालयीन मुलींची छेडछाड करणे या घटनांमध्ये वाढ झाली होती. बसस्थानकामध्ये पोलिस चौकी सुरू नसल्याने या प्रकारामध्ये वाढ होत होती. याबाबत दैनिक ‘पुढारी’ ने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलिस चौकी सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला. यानंतर संगमनेर शहरातील बस स्थानकात पोलिस चौकी सुरू करण्यात आली आहे.

संगमनेर शहरात मध्यवर्ती ठिकाणी सर्व सुविधांयुक्त बस स्थानकाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र या बस स्थानकामध्ये पोलिस चौकी नसल्यामुळे पोलिस या ठिकाणी थांबत नव्हते. त्यामुळे बस स्थानकातील एसटी बसमध्ये बसत असतांना महिलांचे दागिने ओरबाडने त्याच प्रमाणे प्रवाशांचे पाकीट मारणे या सारख्या छोट्या मोठ्या चोर्‍या राजरोसपणे या बसस्थानकामध्ये होत होत्या. तसेच ग्रामीण भागातून महाविद्यालय शिक्षण घेण्यासाठी येणार्‍या मुलींची छेडछाड होण्याचे प्रमाणही वाढले होते.

या सर्व वाढत्या प्रकारांना आळा बसण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेनापक्षाचे खा. सदाशिवराव लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपर्कप्रमुख कमलाकर कोते, जिल्हा प्रमुख राजेंद्र देवकर, जिल्हा समन्व्यक विठ्ठल घोरपडे, उपजिल्हा प्रमुख रणजित ढेरगे यांच्या आदेशानुसार तालुका प्रमुख रमेश काळे, राजेंद्र सोनवणे यांनी संगमनेर बस स्थानकामध्ये पोलिस चौकीची निर्मिती करण्यात आली आहे. या पोलिस चौकीचे उद्घाटन शिर्डी व संगमनेर उपविभागाचे पोलिस उपाधीक्षक संजय सातव संगमनेरचे आगार व्यवस्थापक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी डॉ. अमोल कर्पे, सोमनाथ भालेराव, वाहतूक पोलिस कर्मचारी राजेंद्र जगधने, बाळासाहेबांची शिवसेना यापक्षाचे शहर प्रमुख विकास भरीतकर, युवासेना तालुका प्रमुख राजेंद्र म्हस्के, युवासेना शहर प्रमुख शंकर मुर्तडक, लखन घोरपडे, युवा सेना उपशहर प्रमुख विनोद सूर्यवंशी, भूषण नरवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कायमस्वरूपी पोलिसांची नियुक्ती करावी

संगमनेर बस स्थानकात प्रवाशांची कायमच वर्दळ सुरू असते. बसस्थानक वर प्रवाशांचे होणार्‍या चोर्‍या रोखण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या वतीने पोलिस चौकी सुरू करण्यात आलेली आहे. मात्र या पोलिस चौकीसाठी कायमस्वरूपी दोन पोलिसांची नियुक्ती होणे गरजेचे आहे. पोलिस उपाधीक्षक संजय सातव यांनी लक्षघालून कायमस्वरूपी दोन पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

 

Back to top button