अपघातांची मालिका थांबता थांबेना! पांढरीपुलावर तीन वाहनांचा विचित्र अपघात

अपघातांची मालिका थांबता थांबेना! पांढरीपुलावर तीन वाहनांचा विचित्र अपघात
Published on
Updated on

नगर तालुका; पुढारी वृत्तसेवा : नगर- औरंगाबाद महामार्गावर सोमवारी (दि.2) सकाळी नऊ वाजता तीन वाहनांचा विचित्र अपघात झाल्याने वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली. वाहनांच्या दुतर्फ रांगा लागल्या होत्या. अपघातात चालक किरकोळ जखमी झाले असून, वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. पांढरीपुल परिसरात अपघातांची मालिका सुरूच असून, वारंवार मागणी करूनही येथे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येत नसल्याने अपघातांची मालिका थांबत नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले. सोमवारी सकाळी पांढरीपुल चौकात तीन वाहनांचा विचित्र अपघात झाल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन रस्त्याच्या दुतर्फा सुमारे दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

नगरकडून औरंगाबादकडे जाणार्‍या कंटेनरने (एन. एल. 1 एल. 1557) औरंगाबादकडे जाणार्‍या कंटेनरला (एम.एच.20 डी.ई. 3637) धडक दिली. याचवेळी औरंगाबादकडून नगरकडे जाणार्‍या ट्रकला (एम.एच.20 डी.ई. 7200) कंटेनरची जोराची धडक बसली. एक कंटेनर दोन गाड्यांमध्ये दबला गेल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले.

वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन रस्त्याच्या दुतर्फा सुमारे दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा
वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन रस्त्याच्या दुतर्फा सुमारे दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा

दोन कंटेनर व ट्रकमध्ये घडलेल्या अपघाताने रस्ता पूर्णतः बंद झाला होता. त्यानंतर लगेच दुपारी 12 वाजता घाटामध्ये हॉटेल मिलियन पार्क समोर ट्रक (टी.एन. 52 एफ. 8595) उलटल्याने चालक व एक जण जखमी झाला आहे. एका दिवसात तीन अपघात झाल्याने अपघातांची कल्पना येते.

रविवारी रात्री अकराच्या सुमारास पांढरीपुल येथील पुलावर कांदा घेऊन जाणारा ट्रक (डब्ल्यू. बी. 33 एफ. 0666) हा रस्त्यावर उलटल्याने अगोदरच वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. त्यातच तीन वाहनांचा अपघात झाल्याने संपूर्ण वाहतूक ठप्प झाली. क्रेनच्या साहाय्याने वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

'तत्काळ योग्य त्या उपाययोजना करा'
पूल परिसरात वाढते अपघात पाहता तत्काळ योग्य त्या उपाययोजना, दिशादर्शक फलक, आपघात स्थळाची माहिती, ठिकठिकाणी रेड सिग्नल बसविण्याची मागणी अध्यक्ष बद्रीनाथ खंडागळे, सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ काळे, खोसपुरी माजी सरपंच सोमनाथ हारेर, संतोष बोरूडे, महादेव औटी, अमोल भवार, माजी सरपंच बाबाभाई शेख, बडे मामा यांच्यासह परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली आहे.

न्यूट्रल वाहन आणि हॉटेलची गर्दी
इमामपूर घाटातील तीव्र उतार आणि पांढरीपूल येथील हॉटेल समोर अस्ताव्यस्त लावलेल्या वाहनांमुळेही अपघात वाढत आहेत. तीव्र उताराला अवजड वाहने न्यूट्रल करण्यात येत असल्याने वाहनावर चालकाचे नियंत्रण राहत नाही. याबाबीही अपघातास कारणीभूत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले.

पांढरीपूल परिसरात वारंवार अपघात घडत आहेत. अनेकांची बळी गेले असून, वेळोवेळी मागणी करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. अपघात टाळण्यासाठी तात्काळ योग्य त्या उपाययोजना केल्या नाही, तर परिसरातील नागरिकांसह आंदोलन करण्यात येईल.
                                                                      – बद्रीनाथ खंडागळे,
                                                                        अध्यक्ष, वांजोळी

औरंगाबाद रस्त्यावर पांढरीपूल गाव तीव्र उतारावर वसलेले आहे. घाटामध्ये वाहनांचा वेग जास्त असून, पांढरीपूल येथे हॉटेल व्यवसायिकांमुळे रस्त्यावर मोठी गर्दी असते. भविष्यात येथे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाकडून तत्काळ उपाय योजना होणे गरजेचे आहे.
                                                           – आदिनाथ काळे, सामाजिक कार्यकर्ते

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news