

पारनेर; पुढारी वृत्तसेवा : पारनेर-नगर मतदारसंघातील दोन रस्त्यांच्या कामांसाठी 2 कोटी साठ लाख रूपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर झाल्याची माहिती आमदार नीलेश लंके यांनी दिली. पारनेर तालुक्यातील सारोळा आडवाई ते खोडदेबाबा मंदिर या ग्रामीण मार्ग क्र. 74 च्या दुरूस्तीसाठी 1 कोटी 30 लाख रूपयांचा, तर नगर तालुक्यातील शिंगवे ते वांबोरी या ग्रामीण मार्ग क्र.3 च्या सुधारणेसाठी 1 कोटी 30 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. दोन्ही रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी संबंधित ग्रामस्थांकडून आ. लंके यांना साकडे घालण्यात आले होते. आ. लंके यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दोेन्ही रस्त्यांसाठी निधी मंजूर करून घेतला.
आमदार लंके म्हणाले, मतदारसंघातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपला नेहमीच पाठपुरावा सुरू असतो. विविध गावांमधील प्रश्नांना प्राधान्यक्रम देण्यात येऊन ते सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मंत्रालय स्तरावर अनेक प्रस्तावांचा पाठपुरावा सुरू आहे. जलजीवन मिशन अभियानांतर्गत अनेक गावांमध्ये पाणीयोजनांना मंजुरी मिळाली असून, अनेक गावांमध्ये या योजनांची कामेही सुरू झाली आहेत.त्या त्या गावांसाठी शाश्वत पाणी योजना उपलब्ध होणार असून माता भगिनींच्या डोक्यावरील हंडा कायमचा दुर होणार आहे.
जलसंधारणाच्या माध्यमातूनही अनेक तलावांची दुरूस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे गळती असणार्या तलावांची गळती थांबून त्याचा उपयोग शेतीच्या सिंचनासाठी होत आहे. रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य आदी प्रश्नांबरोबरच मतदारसंघातील नागरिकांच्या वैयक्तीक प्रश्नांनाही न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात येत असल्याचे आ. लंके यांनी सांगितले.