सावित्रीच्या लेकींनो आकाशाला गवसणी घाला! राणीताई लंकेंचे मुलींना आवाहन

पारनेर; पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले यांनी आपणास शिक्षणाचा हक्क दिला. सावित्रीच्या लेकींनी मिळालेल्या या संधीचा फायदा घेत विविध क्षेत्रात छाप पाडली आहे. विविध क्षेत्रांमध्ये सध्या कार्यरत असलेल्या भगिनींचा आदर्श घेऊन आकाशाला गवसणी घालण्याचा निश्चय करा, असे आवाहन जिल्हा परिषद माजी सदस्या राणी लंके यांनी केले. पारनेर शहरातील सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीय व आर्थिक दृष्ट्या मागास मुुलींच्या वसतिगृहात स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्षा सुरेखा भालेकर, पारनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर, मीरा पुजारी, वसतिगृह अधिक्षिका करुणा ढवळे व मान्यवर, विद्यार्थींनी उपस्थित होत्या.
लंके म्हणाल्या, पूर्वीच्या काळात महिलांना घराबाहेर पडण्याचीही अनुमती नव्हती. ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी पुढाकार घेत मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून शिक्षणाची कवाडे खुली करून दिली. मुलगी शिकली, तर काय चमत्कार होतो, याची अनेक उदाहरणे आपण पाहतो. शासनाने उपलब्ध करून दिलेल्या वसतिगृहात राहून तुम्ही शिक्षण घेत आहात.
आई, वडिलांनी तुमच्यासाठी घेतलेले अपार परिश्रम अभ्यास करताना डोळ्यापुढे ठेऊन आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न उराशी बाळगा, असेही लंके म्हणाल्या. आपल्या आयुष्यातील कलागुणांचा अविष्कार म्हणजे स्नेहसंमेलन असते. शिक्षणाबरोबर जीवनाचे शिक्षण देण्याचे काम शिक्षक करतात. विद्यार्थीनींनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन जिंकण्याची आस ठेवावी. आपल्यामधील सुप्त कलागुणांना वाव देत छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षामध्ये रूपांतर करा, असे आवाहन उपनगराध्यक्षा सुरेखा भालेकर यांनी केले.