नगर : 205 उमेदवारांची मैदानी चाचणी; पोलिस भरतीसाठी पहाटे 5 वाजल्यापासून उमेदवारांच्या रांगा | पुढारी

नगर : 205 उमेदवारांची मैदानी चाचणी; पोलिस भरतीसाठी पहाटे 5 वाजल्यापासून उमेदवारांच्या रांगा

नगर; पुढारी वृत्तसेवा : गत तीन वर्षांपासून रखडलेली पोलिस दलातील चालक पदासाठी भरती प्रक्रिया आजपासून नगर येथे सुरू झाली. आज सोमवारी पहिल्या दिवशी 250 उमेदवारांची शारीरिक आणि मैदानी चाचणी झाली. नोंदणी करूनही 183 उमेदवारांनी चाचणीला गैरहजेरी लावली. पोलिस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून असलेले तरुण-तरुणी गेल्या दोन महिन्यांपासून भरतीचा सराव करत होते. नगर येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर शारीरिक, मैदानी चाचणी सुरू झाली. पहाटे 5 ते सकाळी 11 पर्यंत या भरती प्रक्रियेचे नियोजन करण्यात आले आहे. नगर पोलिस दलातील भरतीच्या 139 जागांसाठी 13 हजारांवर अर्ज दाखल झाले आहेत. भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी 2 ते 14 जानेवारीदरम्यान घेण्यात येणार आहे.

पारदर्शक पध्दतीने ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. जिल्हा पोलिस दलाकडून मैदानी चाचणीची तयारी योग्य नियोजनासह पूर्ण करण्यात आली असून पहिल्या दिवशी 205 शिपाई वाहन चालकांनी शारीरिक तसेच मैदानी चाचणीसाठी हजेरी लावल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे (नगर) आणि स्वाती भोर (श्रीरामपूर) यांच्या नियंत्रणाखाली सुमारे 400 पोलिस अधिकारी, कर्मचारी भरती प्रक्रियेच्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.

आजपासून शिपाई पदाची मैदानी चाचणी

नगर पोलिस दलाच्या शिपाई पदासाठी मंगळवार (दि.3) पासून शारीरिक आणि मैदानी चाचणी होणार आहे. यासाठी मंगळवारी वेळापत्रकानुसार 560 पोलिस शिपायांची चाचणी घेतली जाणार असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक कमलाकर जाधव यांनी दिली.
हे कागदपत्रे आवश्यक
ओळखपत्राच्या दोन प्रती
आवेदन अर्जाच्या दोन छायांकित प्रती
सर्व मूळ कागदपत्रे
सर्व कागदपत्रांचा छायांकित प्रतींचा संच
अर्जावर सादर केलेले फोटो
आरक्षण, क्रीडा प्रमाणपत्र, चारित्र्य पडताळणी अहवाल, आधारकार्ड,
पॅनकार्ड, एलएमव्ही लायसन्स, प्रवेश पत्र

Back to top button