संगमनेरात सरते वर्ष खून, दरोड्याने गाजले | पुढारी

संगमनेरात सरते वर्ष खून, दरोड्याने गाजले

संगमनेर : शहरासह तालुक्यामध्ये सरत्या वर्षात गुन्हेगारी दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढताना दिसली. अनेक महत्त्वपूर्ण व किचकट गुन्ह्यांचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले असले तरी सरत्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात सुकेवाडी आणि पावबाकी या दोन ठिकाणी पडलेले सशस्त्र दरोडे व अभियांत्रिकीचे महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या संकेत नवले खून प्रकरणाने सरते वर्ष चांगलेच गाजले. संगमनेर शहर पोलिसांना या दोन्ही मोठ्या घटनेतील आरोपी जेरबंद करण्यात नाकीनऊ आले. संगमनेर तालुक्यातून पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्ग कोल्हार घोटी राज्य महामार्ग आणि नांदूर शिंगोटे ते लोणी असे तीन मार्ग जातात, मात्र पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर सर्वाधिक अपघात झाले. वर्षभरात या तिन्ही महामार्गावर तब्बल 18 गंभीर अपघात झाले.

22 जण गंभीर जखमी झाले तर या 27 अपघातांमध्ये जवळ- जवळ 31 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.  संगमनेर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका वर्षात 3 खुन झाले. यापैकी 2 खून उघड करण्यास पोलिसांना यश आले आहे. वर्षभरात 2 दरोडे पडले आहेत. त्यातील एका दरोड्यातील दरोडेखोरांना जेरबंद करण्यात यश आले आहे. तसेच 21 प्रकारच्या जबरी चोरी झाल्या आहेत. यात 16चोर्‍या उघड झाल्या आहेत. 48 घरफोड्या झाल्या असून 6घरफोड्या उघड झाल्या. अद्यापही 42 घरफोडयांचा तपास करणे बाकी आहे.

संगमनेर तालुक्यात वर्षभरात वाळूचे केवळ दोनच मोठे गुन्हे दाखल झाले. संगमनेर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून 232 छोटे मोठी वाहने चोरीस गेले. यातील 42 गुन्हे उघड करण्यास पोलिसांना यश आले आहे. संगमनेर शहरात वारंवार गोहत्या होण्याचे प्रमाणसुद्धा वर्षभरात कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहे. सर्वाधिक गोवंशाची गोहत्या मोमीनपुरा, जम-जम कॉलनी भारत नगर आदी भागात 38वेळा पोलिसांनी छापे टाकून हजारो टन गोमांस पकडले. अनेक वेळा जिवंत जनावरे त्याबरोबर जप्त केले. अवैध्य मार्गानेदारू विक्री करणार्‍या 73 जणांवर वर्षभरात गुन्हे दाखल करण्यात आले तर 13 गुटखा विक्रेत्यांवर छापे टाकले. शहर पोलिस हद्दीतून 21 मुली पळून गेल्या. यातील 17 महिला, मुलींना शोधण्यात पोलिसांना यश आल्याचे सांगण्यात आले.

चोरट्यांचे चांगलेच फावले..!

संगमनेर शहराची परिस्थिती बघता अपूर्ण पोलिस संख्या बळ,अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बदलीची घाई यामुळे सध्या संगमनेर शहरात मोजक्याच पोलिस कर्म चार्‍यांवर संगमनेर शहर पोलिस ठाण्याचा कारभार चालू आहे, मात्र संपूर्ण संगमनेर शहरात छोट्या-मोठ्या चोर्‍या होतच आहेत, याकडे मात्र पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे चोरट्यांचे चांगलेच फावले जात आहे. यावरून पोलिसांचा आता चोरट्यांवर वचक राहिला नसल्याचे दररोज घडणार्‍या घटनांवरून दिसत आहे.

Back to top button