नगर : पुढारी वृत्तसेवा : शस्त्रांच्या धाकावर दरोडा टाकून चोरी करणार्या सराईत दोन आरोपींना एलसीबीने जेरबंद केले आहे. सहा दरोडेखोरांनी कल्याण रोड भागात चार घरांवर दरोडा टाकून सव्वा चार लाखांचा ऐवज लुटला होता. तसेच संगमनेर तालुक्यातील पावबाकी, सुकेवाडी येथे देखील दरोडा टाकून लाखोंचा ऐवज दरोडेखोरांनी चोरून नेला होता. या गुन्ह्यांतील दोन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले असून इतर आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.
रावन उर्फ छनक नादर चव्हण, फिलीप नादर चव्हाण (दोन्ही रा. सालेवडगाव रोड, चिचोंडी पाटील, ता. नगर) अशी अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. शहरातील कल्याण रोड भागातील विद्या कॉलनी तसेच गाडळकर मळा, आगरकर मळा या ठिकाणी सहा दरोडेखोरांनी चार घरांवर दरोडा टाकल्याची घटना सोमवारी (दि.26) घडली होती. दरोडेखोरांनी चाकूच्या धाकावर सुमारे सव्वा चार लाखांचा ऐवज लुटून नेला होता. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच संगमनेर तालुक्यातील पावबाकी आणि सुकेवाडी येथेही दरोड्यांचे गुन्हे घडले होते.
लागोपाठ दरोड्याच्या घटना घडल्याने दरोडेखोरांना गजाआड करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले होते. स्थानिक गुन्हे शाखेकडून या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना माहिती मिळाली की, प्रशांत उर्फधोळ्या चव्हाण (रा. सालेवडगाव रोड, चिचोंडी पाटील, ता. नगर) हा दरोडा टाकणारा आरोपी व त्याचे साथीदार सालेवडगावच्या माळरानावर लपून बसलेले आहेत. त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एलसीबीच्या पथकाला सहा ते सात इसम लिंबाच्या झाडाखाली बसलेले दिसले. पोलिसांची चाहूल लागल्याने आरोपींनी तेथून पळ काढला. पोलिसांनी दोन आरोपींना पाठलाग करून ताब्यात घेतले तर इतर संशयीत आरोपी पळून गेले. आरोपींना पोलिसी खाक्या दाखवताच दरोड्याच्या गुन्ह्यांची कबुली दिली. पुढील तपास कोतवाली पोलिस करीत आहेत.
आरोपी रावन उर्फछनक नादर चव्हाण सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर नगर तालुका, कोतवाली, संगमनेर पोलिस ठाण्यात दरोडा, गंभीर दुखापत करणे असे 3 गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी फिलीप नादर चव्हाण याच्यावर नगर आणि बीड जिल्ह्यात दरोडा व घरफोडीचे 4 गुन्हे दाखल आहेत.