नगर : उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावं : शिक्षण मंत्री दीपक केसरकर | पुढारी

नगर : उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावं : शिक्षण मंत्री दीपक केसरकर

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा :  पैशाने प्रेम विकत घेता येत नाही. प्रेमाने मन जिंकावे लागते. जेव्हा घराला आग लागते, तेव्हा अगोदर आग विझवावी लागते. अनेक जण आपल्याला सोडून गेले. याचे आत्मपरीक्षण उद्धव ठाकरे यांनी करावं, असा सल्ला राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिला.  नववर्षानिमित्त मंत्री केसरकर रविवारी (दि.1) शिर्डीत साई दर्शनासाठी आले असता प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी साईबाबा संस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. मंत्री केसरकर म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज हे धर्मरक्षक आणि स्वराज्यरक्षक देखील आहेत. त्यांनी यातना सोसल्या, मात्र धर्म नाही बदलला. शब्दछल करण्यात काही महत्त्व नाही. विरोधी पक्षनेते अजित पवार हे बाहेरून कठोर असले तरी, त्यांचं मन मात्र निर्मळ आहे. बोलताना फटकळ बोलतील, मात्र विरोधी पक्षनेता कसा असावा, तर अजित पवार यांच्यासारखा, अशा शब्दात मंत्री केसरकर यांनी पवारांचं कौतुक केलं.

उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मला आदर असून, कटूता कमी करणे त्यांच्या हातात आहे. जेव्हा घर पेटते, तेव्हा अगोदर आग विझवावी लागते, कशामुळे लागली ते नंतर बघू. अगोदर आपण आपल घर सुरक्षित ठेवू, असे मी उद्धव ठाकरे यांना बोललो होतो. मला ते बोलले त्याचं दु:ख वाटलं नाही, पण जे काही माध्यमात दाखविलं गेलं, त्यामुळे भावना दुखावल्या गेल्या. प्रेमाचा आदर आहे, तो कमी होता कामा नये. मी सगळ्यांचे एक-दोन दिवसांत उत्तर देईल.

त्यांच्या आजूबाजूची लोकं जे सांगतात, त्यावर ते मत बनवित असतात. पैशाने प्रेम विकत घेता येत नाही, तर प्रेमाने मन जिंकावं लागतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांची मने जिंकली. निश्चित काहीतरी घडलं, त्यामुळे अनेकजण पक्ष सोडून गेले. मी जसं आत्मपरीक्षण केलं, तसं उद्धव ठाकरे यांनीही करावं, असा सल्लाही केसरकर यांनी दिला आहे.

Back to top button