नगर : चांदेकसारेत कोल्हे गटाची मते काळे गटाला मिळाल्याने होन विजयी | पुढारी

नगर : चांदेकसारेत कोल्हे गटाची मते काळे गटाला मिळाल्याने होन विजयी

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा :  कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत परजणे गटाला बरोबर घेत काळे गटाने एक हाती सत्ता प्रस्थापित केली होती, मात्र उपसरपंचाच्या निवडणुकीत काळे गटातील दोन उमेदवारांनी उपसरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज भरल्याने गटांतर्गतची खदखद पुन्हा उफाळून आली. याचा फायदा घेत कोल्हे गटाने काळे यांच्या दुसर्‍या गटाला उघड पाठिंबा देत सचिन भगीरथ होऊन यांना विजयासाठी हातभार लावला. काळे गटाचे वसीम सय्यदनुर शेख यांचा कोल्हे गटाने मदत केलेले काळे गटाचे सचिन भगीरथ होन यांनी चार मतांनी पराभव केला.

निवडणूक निर्णय अधिकारी सहायक निबंधक नामदेव ठोंबळ यांनी सचिन होन यांना उपसरपंच पदाच्या निवडीत विजय घोषित केले. कोल्हे गटाने दाखवलेल्या पाठिंबामुळे व काळे गटांतर्गत असलेल्या राजकारणामुळे पुन्हा एकदा चांदेकसारे ग्रामपंचायतीची चर्चा वाढली. सरपंच किरण होन यांच्या अध्यक्षेखालीही निवडणूक पार पडली. उपसरपंच पदाचा उमेदवार कोण यावर दोन दिवस अगोदर काळेगटामध्ये चर्चा झाली. या चर्चेत एका गटाने सचिन होन हे सरपंच पदाचे दावेदार होते, मात्र त्यांनी माघार घेतली त्यांनाच आता उपसरपंचपद द्यावे अशी भूमिका घेतली तर दुसर्‍या गटाने वसीम शेख यांचे नाव उचलून धरले.

रोटेशन पद्धतीने पहिल्यावर्षी वसीम शेख यांना उपसरपंचपद द्यावे, असा आग्रह दुसर्‍या काळे गटातील सदस्यांनी धरला, मात्र एकमत न झाल्याने चर्चा निष्फळ ठरली. आ. आशुतोष काळे यांच्याकडे देखील हा तिढा गेला. त्यांनी वसीम शेख यांना पहिल्या वर्षी उपसरपंचपद देण्याचे निश्चित केल्याची माहिती समजते, मात्र गटातील दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी माघार न घेतल्याने ही निवडणूक गुप्त मतदार पद्धतीने करण्यात आली. याचाच फायदा कोल्हे गटाने घेतल्याने चर्चा रंगत आहे.

Back to top button