नगर : सरकारी दवाखान्याने गाठली ‘शंभरी’ ! | पुढारी

नगर : सरकारी दवाखान्याने गाठली ‘शंभरी’ !

कैलास शिंदे :

नेवासा : ब्रिटिश काळात नेवासा शहरात उभारलेल्या सरकारी दवाखाना इमारतीला 1 जानेवारी 2023 या नवीन वर्षांत 100 वर्षे पूर्ण होत आहेत. या इमारतीचे आज वास्तूपूजन करून तिची शताब्दी साजरी करण्यात येणार आहे. या निमित्त नेवासा तालुका मेडिकल असोसिएशनकडून वर्षभर क्षयरोगी रुग्णांना प्रोटीन पावडरचे वाटप करण्यात येणार आहे. सन 1923 मध्ये ब्रिटिश सरकारने तालुका डिस्पेन्सरीच्या माध्यमातून या इमारतीत तालुक्यातील जनतेसाठी आरोग्य सेवा सुरू केली होती.

तेव्हापासून आजपर्यंत या वास्तूने ऊन, वारा, पाऊस झेलत, काळाच्या ओघात आलेल्या मानव, निसर्गनिर्मित अनेक साथी, आजार, अपघातग्रस्तांना सेवा व आधार दिला. अनेक सेवाभावी डॉक्टरांनी व कर्मचार्‍यांनी जुन्या काळातील सेवेचा वारसा जपत, नेवासकर व तालुक्यातील जनतेस आरोग्य सेवा दिली. किरकोळ डागडुजी वगळता आजही ही प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत भक्कमपणे उभी आहे. अजूनही या इमारतीत शहरवासीयांना व परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवा देण्याचे कार्य केले जात आहे. आजही या वास्तूचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या वास्तूला 1 जानेवारी 2023 रोजी 100 वर्षे पूर्ण होत आहेत. सर्व नेवासकर व सेवाभावी संस्था मिळून या सेवाभावी संस्थेच्या शताब्दी वर्ष सोहळ्याचा शुभारंभ रविवारी सकाळी 11 वाजता वास्तूूपूजन व नेवासा मेडिकल असोसिएशनच्या वतीने क्षयरोगी रुग्णांना वर्षभर प्रोटीन पावडरचे पॅकेट वाटप करण्यात येणार आहे. या सेवाभावी संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सोहळ्यास नेवासकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नेवासा मेडिकल असोसिएशनचे डॉ.करणसिंह घुले व वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र कानडे यांनी केले आहे.

माजी आमदार नरेंद्र घुलेंना श्रेय !

नगर जिल्ह्यात ज्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय निर्माण झाली, तेथील प्राथमिक आरोग्य केंद्र इतरत्र हलविली गेली. परंतु, शेवगाव व नेवासा येथील ग्रामीण रुग्णालय गावापासून दूर असल्याने तत्कालीन आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी विशेष बाब म्हणून ही दोन्ही आरोग्य केंद्र इतरत्र स्थलांतरित होऊ दिली नाही. निश्चितच या गोष्टीचे श्रेय घुले यांना आहे.

 

Back to top button